दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार , दिनांक : 23 सप्टेंबर 2026

१८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार नोंदणी करून,लोकशाही बळकट करण्यासाठी तरुणांचा राजकीय सहभाग महत्त्वाचा — तहसीलदार गणेश जाधव
भारतीय लोकशाही अधिक बळकट, सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा — तहसीलदार गणेश जाधव

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी : भारतीय लोकशाही अधिक बळकट, सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव ठेवून मतदार म्हणून आपले नाव नोंदवावे. नवीन मतदारांनी मतदार नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक ६ भरावा तसेच आपल्या गावातील नागरिकांमध्येही मतदार नोंदणी आणि मतदानाबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथे राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नव-मतदार नोंदणी व जागृती अभियान २०२६-२७’ अंतर्गत आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
तहसीलदार गणेश जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, लोकशाही शासनव्यवस्थेत नागरिकांना शासननिर्मितीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार मतदानाच्या माध्यमातून मिळतो. निवडणुका हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधार असून, मतदानाच्या माध्यमातून नागरिक आपल्या पसंतीचे लोकप्रतिनिधी निवडतात. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक युवक-युवतीने मतदार यादीत आपले नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे.
नवीन मतदारांनी फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. केवळ स्वतःची मतदार नोंदणी करून न थांबता विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील, गावातील आणि परिसरातील नागरिकांनाही मतदार नोंदणीचे महत्त्व समजावून सांगावे. मतदान हा केवळ अधिकार नसून लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांची जबाबदारीदेखील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना शासन निवडण्याची संधी मिळते. त्यामुळे तरुण पिढीने लोकशाही मूल्ये, संविधानिक अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. युवक हा देशाचा महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या सक्रिय सहभागामुळे लोकशाही प्रक्रिया अधिक व्यापक आणि प्रभावी होऊ शकते, असेही तहसीलदार जाधव यांनी सांगितले.


मतदार नोंदणी म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य — प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार म्हणून आपले नाव लवकरात लवकर नोंदवावे. मतदार नोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.
विद्यार्थ्यांनी स्वतः मतदार नोंदणी करून इतर नागरिकांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे. राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक नागरिकामध्ये असणे आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व समजून घेत युवकांनी जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहन डॉ. घुले यांनी केले.

महाविद्यालयात नवमतदार नोंदणी अभियान :कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भागवत महाले यांनी सांगितले की, महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘नव-मतदार नोंदणी अभियान २०२६-२७’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पात्र विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करावी, यासाठी महाविद्यालयाच्या स्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने मतदार नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे डॉ. महाले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.
मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून त्र्यंबकेश्वर तहसीलदार गणेश जाधव, नायब तहसीलदार नितीन मेधने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले, IQAC समन्वयक डॉ. विठ्ठल सोनवणे, सकाळ सत्रप्रमुख डॉ. समाधान गांगुर्डे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. भागवत महाले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विष्णू दिघे, प्रा. मनोज मगर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

तरुणांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय व्हावे : व्याख्यानातून विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची प्रक्रिया, मतदानाचे महत्त्व, लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांची भूमिका आणि जबाबदार मतदार म्हणून युवकांनी बजावायची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
आजच्या काळात युवकांची संख्या मोठी असून, देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे युवकांनी संविधानिक मूल्ये समजून घेऊन लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीपासून मतदानापर्यंत प्रत्येक टप्प्यावर युवकांनी जबाबदारीने सहभाग घ्यावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे सहकार्य : हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील डॉ. दिलीप भेरे, डॉ. मनोहर जोपळे, डॉ. अजित नगरकर, डॉ. सुलक्षणा कोळी, डॉ. वैशाली जाधव, डॉ. वर्षा जुन्नरे, प्रा. सोनल दाते यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास सुमारे ९० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नवमतदार नोंदणी अभियानाबाबत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णू दिघे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मनोज मगर यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये मतदार नोंदणीबाबत जागृती निर्माण करून त्यांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला.



दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार , दिनांक : 23 सप्टेंबर 2026
