दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार , दिनांक : 29 सप्टेंबर 2026

file 0000000037948211bf34b8c3a800d82e (1)

महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

whatsapp image 2026 09 29 at 7.08.53 pm (1)

कोकण व नाशिक विभागातील ‘पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्या’चा शुभारंभ; १ लाखांहून अधिक युवकांची नोंदणी, २५ हजारांपेक्षा अधिक रोजगार संधी उपलब्ध

मुंबई, प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके

मुंबई, दि. २९ : शिक्षणासोबत कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालणे ही काळाची गरज आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून बदलत्या तंत्रज्ञानानुसार युवकांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि स्वतःला रोजगारक्षम बनवणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण होत आहे. जगातील २८ हून अधिक देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची मागणी असून, महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्या’चा कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पणन मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. हेमलता बागला, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अमित सैनी, मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सृजन ट्रस्टचे अध्यक्ष दीपक मुकादम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्यातील विविध जिल्ह्यांतून हजारो युवक-युवती ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष प्रणालीद्वारे या उपक्रमात सहभागी झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे रोजगार मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.

दोन उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहीदा परमाणिक यांना क्रेवा कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, बेलापूर आणि कांती शंभू चव्हाण यांना क्रेवा कॅपिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, कुर्ला या कंपन्यांकडून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.यामुळे रोजगार मेळावे हे केवळ नोकरीच्या संधींची माहिती देणारे व्यासपीठ न राहता, उमेदवार आणि नियोक्त्यांना थेट जोडणारे माध्यम ठरत असल्याचे अधोरेखित झाले.

whatsapp image 2026 09 29 at 7.08.53 pm

शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराची त्रिसूत्री महत्त्वाची

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण आणि नाशिक विभागातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘अंत्योदय’ आणि ‘एकात्म मानव दर्शन’ या विचारांचा संदर्भ देत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचविण्याच्या दृष्टीने शासन कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.देशातील युवा शक्तीला रोजगारक्षम बनविण्यासाठी शिक्षणव्यवस्थेसोबत कौशल्य प्रशिक्षणाची सांगड घालणे आवश्यक आहे. उद्योगांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे, तर दुसरीकडे युवकांना रोजगाराची आवश्यकता आहे. या दोन्ही घटकांना जोडणारा दुवा म्हणून रोजगार मेळावे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन

आजच्या काळात पारंपरिक शिक्षणासोबत डिजिटल आणि तांत्रिक कौशल्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.त्यामुळे युवकांनी एका पदवीवर किंवा एका कौशल्यावर अवलंबून न राहता सातत्याने ‘अपस्किलिंग’ आणि ‘री-स्किलिंग’ करणे आवश्यक आहे. उद्योगांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.महाराष्ट्राने आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी कौशल्य व भाषा प्रशिक्षणाची व्यवस्था विकसित करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. परदेशातील रोजगाराच्या संधींसाठी विविध विभाग, कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यात समन्वय वाढविण्यावर भर दिला जात आहे.

१ लाखांहून अधिक युवकांची नोंदणी : मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा रोजगार मेळावा केवळ आयटीआय विद्यार्थ्यांपुरता मर्यादित ठेवण्यात आलेला नाही. विविध शैक्षणिक व कौशल्य पार्श्वभूमी असलेल्या युवक-युवतींसाठी प्रत्येक तालुक्यात किमान तीन लहान रोजगार मेळावे आयोजित करण्यावर भर देण्यात येत आहे.केवळ रोजगार मेळावे आयोजित करून थांबण्याऐवजी युवकांना मुलाखतीसाठी सक्षम करण्यासाठी सात दिवसांचे मोफत पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे ६१ हजार युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.या रोजगार मेळाव्यासाठी १ लाखांपेक्षा अधिक युवकांनी नोंदणी केली असून, किमान ७० टक्के युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराशी जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

‘रोजगारक्षम शिक्षण ही काळाची गरज’ – चंद्रकांतदादा पाटील

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविद्यालये व विद्यापीठांमधून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग कौशल्य विकास विभागासोबत समन्वयाने काम करत आहे.युवकांना केवळ रोजगार मेळाव्यात सहभागी करून घेणे पुरेसे नाही. मुलाखतीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य, सॉफ्ट स्किल्स आणि व्यवस्थापन कौशल्य विकसित करणेही आवश्यक आहे. यासाठी मुलाखतपूर्व प्रशिक्षण व अन्य कौशल्य प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला ‘ग्लोबल एम्प्लॉयमेंट हब’ बनविण्याचा प्रयत्न

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक, उद्योग आणि स्टार्टअप परिसंस्थेचा उल्लेख करताना युवकांना राज्याबरोबरच देश-विदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कौशल्य व भाषा प्रशिक्षण देण्याची गरज व्यक्त केली.परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास संबंधित देशाच्या गरजेनुसार भाषा व कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी व पणन क्षेत्रातही युवकांना उद्योग आणि रोजगाराशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

whatsapp image 2026 09 29 at 7.08.54 pm

कोकण व नाशिक विभागात ४०० हून अधिक रोजगार मेळावे

कोकण व नाशिक विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये ४०० हून अधिक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी आतापर्यंत १,५०० हून अधिक उद्योजक व नियोक्ते तसेच १ लाखांहून अधिक रोजगार इच्छुक युवक-युवतींनी नोंदणी केली आहे.सहभागी उद्योजकांकडून २५ हजारांहून अधिक रोजगाराच्या रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्हानिहाय महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्थानिक प्रशासन आणि विविध संस्थांच्या समन्वयातून उमेदवार व नियोक्त्यांना एकत्र आणण्याचे काम करण्यात आले आहे.जिल्हा प्रशासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, कामगार विभाग, उद्योग विभाग, पणन विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विद्यापीठे आणि औद्योगिक संघटनांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे.

महिलांच्या रोजगार सहभागाला विशेष प्रोत्साहन

महिलांच्या रोजगार सहभागाला चालना देण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी स्वतंत्र विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योग, कंपन्या आणि सेवा क्षेत्रातील आस्थापनांचा सहभाग निश्चित करण्यात आला.या विशेष मेळाव्यात ३६ उद्योजकांनी सहभाग नोंदविला. याशिवाय महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध शासकीय महामंडळांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले.महिलांना रोजगाराच्या संधींबरोबरच उद्योजकता, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती मिळावी, हा या विशेष उपक्रमामागील उद्देश आहे.

whatsapp image 2026 09 29 at 7.08.54 pm (1)

युवकांसाठी रोजगाराच्या नव्या दिशांचा प्रयत्न

महाराष्ट्रातील युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, उद्योग आणि रोजगार यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. स्थानिक रोजगाराच्या संधींसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन युवकांना आवश्यक कौशल्ये, भाषा आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे.यामुळे रोजगार शोधणारे युवक आणि कुशल मनुष्यबळ शोधणारे उद्योग यांच्यातील अंतर कमी करण्यास मदत होऊ शकते. राज्यातील युवा शक्तीला आधुनिक कौशल्यांनी सक्षम करून रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या संधींशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो.तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या युगात पदवीसोबत कौशल्य, कौशल्यासोबत प्रशिक्षण आणि प्रशिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.

file 0000000037948211bf34b8c3a800d82e (1)

दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार , दिनांक : 29 सप्टेंबर 2026