एक बीज… हजारो श्वास! वनस्पतीशास्त्र विभागाचा उपक्रम
त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात दोन दिवसीय सीड बॉल निर्मिती व सीड बॉल फेक उपक्रम उत्साहात संपन्न

दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार , दिनांक : 2 ऑगस्ट 2026
त्र्यंबकेश्वर ,( प्रतिनिधी :डॉ. विठ्ठल सोनवणे) मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृती, जैवविविधता संवर्धन आणि स्थानिक वृक्षांच्या संवर्धनासाठी आयोजित दोन दिवसीय “सीड बॉल निर्मिती व सीड बॉल फेक” उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला. वाढते तापमान, जंगलतोड, घटणारी हरितक्षेत्रे आणि बदलते हवामान या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाची गरज अधिक तीव्र झाली आहे. याच उद्देशाने महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाची शिकवण देण्यासाठी हा अभिनव उपक्रम आयोजित केला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी सीड बॉल तयार करून ते त्र्यंबकेश्वर परिसरातील डोंगराळ व वनक्षेत्रात विखुरले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राजश्री झोले यांनी केले.
प्रास्ताविकात वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख तथा IQAC समन्वयक डॉक्टर विठ्ठल सोनवणे यांनी सीड बॉलचे वैज्ञानिक महत्त्व, स्थानिक वृक्षांच्या संरक्षणाची आवश्यकता आणि जैवविविधता जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी निभावायची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आज केलेली वृक्षलागवड आणि सीड बॉल उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठरणार आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्थानिक वृक्षांचे संवर्धन अत्यंत आवश्यक असून विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी आयोजित सीड बॉल निर्मिती कार्यशाळेत सहाय्यक प्राध्यापिका योगिनी पगारे यांनी सीड बॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांना योग्य मातीचे प्रमाण, शेणखताचा वापर, बियांची निवड आणि वैज्ञानिक पद्धतीने सीड बॉल तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी करंज, जांभूळ, चिंच, बहावा, शिरीष, सागवान, बेहडा आणि सीताफळ या स्थानिक वृक्षांच्या बियांचा वापर करून शेकडो सीड बॉल तयार केले. स्थानिक हवामानाशी सुसंगत असलेल्या या वृक्षांमुळे भविष्यात जैवविविधतेचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.
दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर परिसरातील डोंगराळ वनक्षेत्रात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सीड बॉल फेक उपक्रम राबविला. पावसाळ्याचा काळ लक्षात घेऊन नैसर्गिकरीत्या अंकुरण होईल अशा ठिकाणी सीड बॉल विखुरण्यात आले. या उपक्रमामुळे भविष्यात हजारो नवीन रोपे उगवण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.यावेळी डॉक्टर मनोहर जोपळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमास प्राणीशास्त्र विभागप्रमुख सहाय्यक प्राध्यापिका राजेश्री शिंदे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख सहाय्यक प्राध्यापक आशुतोष खाडे, सहाय्यक प्राध्यापक संकेत बोर, सहाय्यक प्राध्यापक निलेश मरसाळे, सहाय्यक प्राध्यापक गोतारणे, सहाय्यक प्राध्यापिका ज्योती ढिकले, सहाय्यक प्राध्यापक . विष्णू दिघे यांची उपस्थिती लाभली.नोंदणीचे काम विद्यार्थिनी स्वाती पोटींदे व संजना बदादे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. दीपक मेढे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाले.कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापिका ममता धनगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे महत्त्व आणि स्थानिक वृक्षसंवर्धनाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला. वनस्पतीशास्त्र विभागामार्फत भविष्यातही अशा समाजोपयोगी, पर्यावरणपूरक आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.पर्यावरण संवर्धनासाठी युवकांचा उत्स्फूर्त सहभाग, स्थानिक वृक्षांच्या बियांचा वैज्ञानिक वापर आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे निसर्गाशी नाते दृढ करणारा हा उपक्रम त्र्यंबकेश्वर परिसरात प्रेरणादायी ठरला आहे. “एक बीज… हजारो श्वास!” या संकल्पनेला साकार करत विद्यार्थ्यांनी हरित भविष्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरविला.
✍️ मुख्य संपादक : प्रोफेसर डॉक्टर भागवत शंकर महाले
📰 दैनिक “दिव्य भारत बीएसएम न्यूज”








दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार , दिनांक : 2 ऑगस्ट 2026
