





त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “नवीन शैक्षणिक धोरण- २०२० “विषयक एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. 3 जुलै 2024
β⇔त्र्यंबकेश्वर, दि.3(प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे):- त्र्यंबकेश्वर येथील मविप्र समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ”नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020” विषयक बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व पालक यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन नाशिक ग्रामीण मविप्रचे संचालक रमेश पिंगळे यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात “नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकांबरोबरच पालकांचीही जबाबदारी वाढली आहे. पालकांनी विशेष लक्ष देऊन त्यांच्या विकासाचा सतत आढावा घेत राहावे. विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्तीसाठी सहकार्य व प्रोत्साहित करावे.”असे मत व्यक्त केले.
सदर कार्यशाळेसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ हे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. रसाळ यांनी शिक्षण म्हणजे काय व नवीन शैक्षणिक धोरणात पालक, विद्यार्थी व प्राध्यापकांनी नेमके काय करावे, याविषयी अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी “आंतरविद्याशाखीय शिक्षण हे नवीन शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असून हे शिक्षण खऱ्या अर्थाने विद्यार्थी केंद्रित असून त्यातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होईल, तसेच ह्या शैक्षणिक धोरणाने जितकी लवचिकता दिली आहे. तितकीच जबाबदारी देखील दिली आहे.” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी “जगात ज्ञानसत्ता होण्याबरोबरच ज्ञान,संशोधन आणि कौशल्यांच्या बळावर मानवी जीवनक्षेत्रांतील मनुष्यबळाची उणीव भरून काढणे हे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांतून क्रेडिट मिळविण्याची सोय झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभिरुचीला खऱ्या अर्थाने वाव मिळणार आहे. पदवीस्तरावर संशोधन ही चांगली बाब आहे.” असे मत व्यक्त केले. त्यांनी अभ्यासक्रम व क्रेडिट प्रणाली बद्दल विद्यार्थ्यांना संबोधित केले. याप्रसंगी बारावी कला, वाणिज्य व विज्ञान वर्गामध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते येथे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या गुणवत्ता सुधारक कक्ष (IQAC)अंतर्गत करण्यात आले होते. प्रा.निलेश म्हरसाळे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.याप्रसंगी IQAC समन्वयक डॉ. विठ्ठल सोनवणे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. श्रीमती नीता पुणतांबेकर यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन श्रीमती डॉ. सुलक्षणा कोळी यांनी केले. कार्यक्रमाला सर्व सत्र प्रमुख,विभागप्रमुख प्राध्यापक,पालक व प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)