दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार , दिनांक 3 ऑक्टोबर 2026


आदि कर्मयोगी फेलोशिपचा पालघरमध्ये यशस्वी समारोप; १२ युवा फेलोंना प्रमाणपत्रे प्रदान
पालघर, (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):- २ ऑक्टोबर २०२६: सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा प्रशासन, पालघर आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या आदि कर्मयोगी फेलोशिपचा यशस्वी समारोप झाला. या उपक्रमात सहभागी झालेल्या १२ अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या समारोप कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनोज रानडे, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्री. पी. के. सिद्धार्थ रामकुमार, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी श्री. पी. व्ही. अमल, सहायक प्रकल्प अधिकारी श्री. दीपक टिके, नियोजन अधिकारी श्री. सतीश रास्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते. जानेवारी २०२६ मध्ये सुरू झालेल्या या फेलोशिपमध्ये जव्हार, विक्रमगड, डहाणू आणि तलासरी या आदिवासी व आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रत्येकी तीन फेलो नियुक्त करण्यात आले होते. तालुका प्रशासनासोबत जवळून काम करताना फेलोंना शासन व क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्यांनी सुरुवातीला तालुका स्तरावरील ओळख कार्यक्रमात स्थानिक प्रशासन आणि गावपातळीवरील संस्थांची माहिती करून घेतली. त्यानंतर १२ गावांतील १२ जिल्हा परिषद शाळांचा समावेश असलेला प्राथमिक शिक्षणाच्या धोरणात्मक पुनर्रचनेवरील अभ्यास केला. पुढे आरोग्य अधिकारी आणि अग्रभागी कार्यरत कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माता मृत्यूची कारणे आणि त्यास कारणीभूत घटक यांचा अभ्यास केला. अंतिम टप्प्यात त्यांनी ६६ ग्रामपंचायतींमध्ये १,३७५ लाभार्थ्यांशी संवाद साधत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), स्वच्छ भारत अभियान आणि जल जीवन मिशन यांचे सामाजिक लेखापरीक्षण (सोशल ऑडिट) केले. फेलोंनी संकलित केलेले क्षेत्रीय पातळीवरील पुरावे आणि समाजाचे दृष्टिकोन विभागीय आढावा आणि आदिवासी भागातील भविष्यातील नियोजनासाठी उपयुक्त ठरतील. या प्रसंगी बोलताना डॉ. इंदू राणी जाखड म्हणाल्या की, ही फेलोशिप “केवळ प्रमाणपत्र मिळविण्याची संधी नसून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, प्रशासकीय व्यवस्थेची ओळख, सामाजिक बांधिलकी, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुण देणारा एक अर्थपूर्ण उपक्रम आहे.” ही फेलोशिप नियमित उपक्रम म्हणून पुढे सुरू ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. तसेच मुख्यमंत्री फेलो आणि समन्वयक सुश्री इंद्रायणी आपटे यांनी दिलेल्या मौल्यवान सहकार्याबद्दल, तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख व महाविद्यालयीन समन्वयक प्रा. संतोष शिरसाट आणि त्यांच्या चमूच्या प्रयत्नांबद्दल जिल्हा प्रशासनाने कौतुक केल

.दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार , दिनांक 3 ऑक्टोबर 2026

