





येडशीत महावितरणकडून वारंवार वीज खंडित, वाढत्या दरांची वीजबिल लूट, जबरदस्तीने वसुली

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 27 डिसेंबर 2024
β⇔येडशी (धाराशिव ),ता.27 (प्रतिनिधी: सुभान शेख):- येडशी गावातील नागरिकांना दररोज वीज पुरवठा खंडित होण्याचा सामना करावा लागत असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महावितरणकडून वारंवार वीज बंद होणे, वाढलेले दर आणि वेळेत बिले भरणाऱ्या ग्राहकांवर होणारी जबरदस्तीने वसुली या गोष्टी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
वीज पुरवठा खंडित, नागरिक त्रस्त : नागरिकांच्या मते, सकाळपासूनच दर तासाला वीज पुरवठा खंडित केला जातो. नियमित वीज बिले भरणाऱ्या ग्राहकांनाही महावितरणकडून गुणवत्तापूर्ण सेवा मिळत नाही. वीज खंडित झाल्यामुळे घरगुती ग्राहकांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वजण हैराण झाले आहेत.
वाढत्या दरांची आणि जबरदस्तीची तक्रार : महावितरणकडून दरवाढीचा थेट फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे.100 युनिटपर्यंत ₹4.72 प्रति युनिट 100 युनिट नंतर ₹10.29 प्रति युनिट या दरवाढीमुळे नागरिकांच्या वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जर बिल भरले नाही, तर वीज मीटरचे कनेक्शन तोडले जाते. नागरिकांच्या मते, महावितरणकडून सरासरी बिल आकारणीच्या नावाखाली लूट सुरू आहे.
ग्रामस्थांची मागणी : गावकऱ्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे: दररोज होणाऱ्या वीज खंडितीला आळा घालावा आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवावा. वाढलेल्या वीज दरांचा पुनर्विचार करावा आणि दर कमी करावेत. वीज बिलांच्या अंतिम तारीख सुनिश्चित करून नागरिकांना वेळेत माहिती दिली जावी. महावितरणच्या सहाय्यक अभियंता आणि उप-अभियंत्यांनी या समस्या सोडवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
ग्रामस्थांचे मत : “वेळेवर बिले भरूनही आम्हाला दर्जेदार वीज सेवा मिळत नाही. याचा त्रास सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे,” असे येथील नागरिकांनी सांगितले. महावितरणने या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत, तर याचा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510