Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

β : अकोले :⇔”आदिवासी जीवन,जंगली संपदा,रानमेवा,दिर्घायुष्यासाठी वरदान ! दुर्मिळ वनसंपदा संवर्धन काळाची गरज”(प्रतिनिधी:अर्जुन तळपाडे)

β : अकोले :⇔"आदिवासी जीवन,जंगली संपदा,रानमेवा,दिर्घायुष्यासाठी वरदान ! दुर्मिळ वनसंपदा संवर्धन काळाची गरज"(प्रतिनिधी:अर्जुन तळपाडे)

0 0 2 8 5 3

“आदिवासी जीवन,जंगली संपदा,रानमेवा, दिर्घायुष्यासाठी वरदान ! दुर्मिळ वनसंपदा संवर्धन काळाची गरज ” 

gray concrete road top between green trees

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज  वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.1 जानेवारी 2024 

β⇔अकोले, ता.1 (प्रतिनिधी : अर्जुन  तळपाडे ) :सहयाद्रीच्या डोंगर कपारी,दरी खोऱ्यात कोळी महादेव, ठाकर, कातकरी , वारली , भिल्ल , कोकणा या अतिप्राचीन आदिवासी जमाती आजही निसर्गाचा आधार घेऊन कष्टाचे तरीही आनंदाने जीवन जगताना दिसतात.पूणे जिल्ह्याचा मावळ प्रांत, अकोले तालुक्याचा डांगाण, ठाणे-पालघरचा कोकण, नाशिक-नंदूरबारचा महालदेश-खानदेश अशा वैशिष्टपूर्ण ऐतिहासिक समृद्ध वारसा लाभलेल्या डोंगररांगात आदिवासी समुदायांबरोबरच इतरही समाज बांधव एकात्मतेने आपली वैशिष्टपूर्ण संस्कृती जपत एकमेकांच्या सहकार्याने नांदत आहेत. कृषिप्रधान भारतभूमीत प्रगत तंत्रज्ञानाने क्रांति केली आणि परंपरागत शेती ऐवजी सुधारीत शेती पद्धती उदयास आली. सह्याद्री विभागात डोंगराळ उतार भागात सुरू असलेली आदिवासींची परंपरागत शेती पद्धती काही अंशी प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊ लागली . मात्र बरीचशी शेती मान्सून पाऊस लहरींवर अवलंबून असल्याने , डोंगर उतारावर असल्याने, जलसिंचनाची उणीव व अडचण असल्याने शेती उत्पादन कमीच. त्यामानाने याच भागातील सखल प्रदेशात शेती मात्र प्रगतीच्या शिखरावर पोहचली .डोंगराळ भागातील जीवन व सखल प्रदेशातील जीवन असे वास्तव्याचे दोन भाग असल्याने जीवनपद्धतीतही अमूलाग्र बदल जाणवतो , तरी पण हे जीवन अस्तित्वासाठी एकमेकांवर नक्कीच अवलंबून आहे. निसर्ग पर्यटन, पाणी, जंगल संपत्ती , पशुपालन , शेती , शिक्षण , व्यापार अशा वेगवेगळ्या कारणांसाठी हे जीवन एकमेकांशी निगडीत आहे .डोंगर भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींकडे आर्थिक सुबत्तेची वाणवा आहे तर सखल प्रदेशातील समूदायाकडे त्या मानाने आर्थिक स्थैर्य योग्य प्रमाणात आहे .डोंगराळ भाग व वनांचे सानिध्य आणि वाहणाऱ्या नदयांचे जल यांचा नैसर्गिक आधार घेताना जीवन जगणारी संस्कृती तर सखल प्रदेशात शेती , व्यापार आणि पशूसंपदा यांचा आधार घेऊन जीवन जगणारी संस्कृती या वैविध्यपूर्ण प्रवाहात मानवी समूदाय आपले रक्षण करत आहे . किंबहूना प्रगतीच्या नव्या वाटा शोधताना दिसत आहे .
                  एकीकडे विज्ञानाच्या प्रगत तंत्रज्ञानामूळे जीवन सुखमय झालेले असताना दुसरीकडे आजही मोठ्या प्रमाणात कोळी महादेव , ठाकर , कातकरी , वारली , कोकणा , भिल्ल या आदिवासी जमाती निसर्गाचा आधार घेत जीवन जगताना पहायला मिळतात . शेती प्रधान देशात जमिनीची कमतरता किंवा शेतजमीनीचे कमी प्रमाण व तुकडीकरण , नैसर्गिक शेतीआणि त्याप्रमाणात वाढलेली जनसंख्या यामूळे उत्पादन कमतरता व त्याबरोबरच आर्थिक अस्थैर्य या समस्या आजही जाणवतात .डोंगराळ भागात वेगवेगळ्या प्रांतातून स्थलांतरीत करून आलेल्या काही आदिवासी जमातींकडे स्वतःचे घरदार , शेतजमीन , पशुसंपदा यांची उणीव असल्याचे दिसते. त्यामूळेच आपले जीवन जगताना निसर्ग संपदाच्या उपलब्ध उपजांवर हे आदिवासी बांधव गुजराण करत आहेत. मासेमारी, लाकूडफाटा, चराईचे गवत , कंदमूळे , फुले , फळे , मध , डिंक , औषधी वनस्पती गोळा करून जवळच्या बाजारपेठेत त्याची विक्री करतात. त्यातून मिळणाऱ्या तोकड्या पैशांवर शिक्षण , आरोग्याबरोबरच आपल्या मुलभूत गरजा पूर्ण करत असतात. मात्र दिवसेंदिवस या जंगली उपजांचे दुर्भिक्ष वाढत असल्याने अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रगत शेती , रस्ते , औदयोगिक विस्तारीकरण , इमारती -घरे बांधकाम , त्यातून होणारी जंगल -जमीनीची धूप या मोठया समस्या निर्माण झाल्या आहेत . जंगलांची मोठया प्रमाणात होणारी ऱ्हास ;त्यातून जंगली प्राण्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे . माकडशिंगी , हरणदोडी, रानशेर, पळस , पांगारा इ . वनस्पती कमी होत आहेत , गिधाडे तर नामशेष झाली आहेत. तरस, कोल्हा ,सायाळ, ऊद, मोर , लाव्हरी , टिटवी , साळूंकी, कोयळी , कुंभारकुकडा, खिळखिळा, व्होलगा, पारवा,ससे, खोकाड, खार इ . पक्षी व प्राणी खूप कमी झाले आहेत. शेकरू ला तर विशेष संरक्षण दिले पाहिजे .
                   वर्षभराच्या वेगवेगळ्या मोसमात या भागात उपलब्ध होणारी वनसंपदा म्हणजे वृक्षांची पाने , करवंदे , आळीव, बोरं ,चाईचा मोहर ,मेका, कोंबडयाची भाजी , बडदा ,कारवी, रानआंबे, हिरडा , कुर्डू, आचकंद, हळदीचे सर्व दुर्मिळ प्रकार , डुंकरकंद, अमरकंद , रामकंद , रोहिणी साल, अनंतमुळ, शतावरी , बेहडा , करंजफळ , हाडसांद , पळस फुले , मूळ -साल , हनुमंत लाळ , रोहिडा , कळलाईमूळ, भुईकोहळा , फांगळा ,भारंगी , रानआवळा, डोळफोड , आणिव ,हाइंदा, चिभडू , चिकन सुपारी , मोह , म्हाळूंग , आचकंद, गांधारी , खाजकुयरी ,तोरण या बहुगुणी वनस्पती आहेत . मानवी आजार जसे की मुळव्याध , मुतखडा , मधूमेह, कावीळ , कंबरदुखी , हिवताप या दुर्धर आजारांसाठी यातील काही वनस्पती उपयोगी आहेत . जंगलातील फळे मोठ्याप्रमाणावर शक्तिवर्धक आहेत .आदिवासी केवळ त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा जंगलाचा वापर करत नाहीत तर उपजीविकेचे साधन म्हणूनही वापरतात . ते नैसर्गिक उत्पादन जसे की इंधनासाठी कोरडे आणि पडलेले लाकूड , बांबू , हाडे , चामडे , कातडे ,पक्षांची रंगीत पिसे, मध , डिंक, फूले आणि औषधी वनस्पती इत्यादी उत्पन्नाचे स्रोत म्हणून गोळा करतात . या भागातून वाहणाऱ्या छोटया -मोठया नदयांचे प्रवाह , धरणे यातील मासे , खेकडे तर पावसाळ्यातील रानमाळावरील किरवे पकडून जवळपासच्या बाजारपेठेत विकतात व आर्थिक अडचण भागवतात . रोजची कुटूंबाच्या अन्नाची गरज हेच मासे , खेकडे यांवर भागवतात . जंगल संपदांचा जीवनात पोटाची भूक भागवण्यासाठी तर कधी पैशाची उणीव भरून काढण्यासाठी वापरत असतात . मिळणाऱ्या पैशांतून धान्य , कपडे , किराणामाल व मुलांचे शिक्षण , लग्न कार्य , दवापाणी यावर खर्च करत असतात . या भागात उंच डोंगररांगा , घनदाट जंगले , पावसाळी मनमोहक धबधबे , गडकिल्ले , प्राचीन मंदिरे , काजवा महोत्सव , धरणे इत्यादी बघण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून मोठया प्रमाणावर पर्यटक येत असतात . अशावेळी येथील स्थानिक आदिवासी गाईड म्हणून काम करतात , जेवणाची व्यवस्था करतात .त्यातूनही हाताला पैसा मिळतो . बरेच आदिवासी बांधव जंगलातील रानमेवा विक्रीसाठी रस्त्यांच्या कडेला ऊन -वारा -पावसात बसलेले असतात . बऱ्याच वेळा सुट्टीच्या दिवशी शाळकरी मुले जंगलातील हा रानमेवा गोळा करून विकताना दिसतात , जेणेकरून आपल्या आई – वडिलांना आर्थिक हातभार लागेल व आपल्या शिक्षणासाठी थोडाफार पैसा मिळेल ही त्यामागची भावना असते . हे आदिवासी लोक खूप काटक व कष्टाळू असतात ; मात्र या परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने नैसर्गिक संपदेवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून राहावे लागते . शहरी सधन भागातील लोक या भागातील दुर्मिळ वनसंपदा विकत घेऊन एक प्रकारे या बांधवांना सहकार्यच करत असतात .तसेही ही नैसर्गिक दुर्मिळ वनसंपदा मानवी आरोग्यास उपयुक्त असल्याने व तिचा आपल्या आहारात वापर केल्याने संकरित अन्नधान्यांपासून उद्धभवणारे अनेक आजार या पासून बरे होत असतात . किंबहूना ही वनसंपदा आपल्या आहारात वापरल्याने कोणतेही आजार जडत नाहीत म्हणजेच हा रानमेवा मानवी दिर्घायुर्मानासाठी वरदान आहे .
             मानव नेहमीच समूहाने जीवन जगत आला आहे . किंबहूना सामाजिक जीवन पद्धती हे मानवाचे वैशिष्ट्ये आहे . प्रत्येक माणूस आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी एकमेकांवर अवलंबून आहे .परिस्थितीनुसार म्हणा किंवा परंपरागत म्हणा आदिवासी जमातीचे लोक डोंगरदऱ्या – खोऱ्यात वास्तव्य करून आहेत .मात्र दैनंदिन वाढत्या प्रगत गरजा भागविण्यासाठी सखल मैदानी प्रदेशातील जनसमुदायांवरही त्यांचे जीवन अवलंबून आहे आणि सखल – सधन पटट्यातील बांधवही पर्यटनासाठी , नैसर्गिक संपदेच्या उपलब्धतेसाठी डोंगरदऱ्या -खोऱ्यातील जीवनाचा वापर करत असतात .त्यामागे नैसर्गिक सौंदर्याचे आकर्षण हे मूख्य कारण आहे . ही एकमेकांची जीवन जगण्याची एक साखळीच आहे . त्यांच्या या पर्यटन विचाराचा येथील स्थानिकांना नेहमीच उपयोग होत आला आहे . मानवी अतिक्रमणामूळे जंगलातील दुर्मिळ वनसंपदा नामशेष झाली आहे . शेकडो जंगली वनस्पतींचा औषधी उपयोग होतो . जंगली वनसंपदेवर तेथील प्राणी जीवन समृद्ध बनलेले असते . मात्र वनांची संख्या घटल्यामूळे दुर्मिळ वनस्पती व प्राणी शोधणे व दिसणे कठीण झाले आहे .आदिवासी लोक खादय वनस्पती कापणी करताना पर्यावरण संवर्धण नियम पाळतात . ज्यामूळे पर्यावरणीय विवेक स्थापित होतो . आसपासच्या बहुतेक जमाती त्यांच्या अधिवास आणि पर्यावरणासाठी जंगलाशी घनिष्ठपणे संबंधित आहेत . ते त्यांच्या जगण्यासाठी , उदरनिर्वाहासाठी , व्यवसायांसाठी आणि रोजगारासाठी थेट नैसर्गिक उत्पादनावर अवलंबून आहेत . मात्र वनसंपदाच दुर्मिळ झाल्याने त्यांचे जीवन संकटात सापडले आहे .एकूणच सर्व मानवी समुदायाचे एकमेकांवरील जीवन व नैसर्गिक संपदे वरील अवलंबित्व धोक्यात आले आहे . मानवाचे आरोग्यच मोठया प्रमाणावर संकटात सापडले आहे .
              आदिवासींच्या बलस्थानांना विज्ञानाची जोड देवून विकास प्रक्रिया गतिमान करणे शक्य आहे .औषधी वनस्पतींची शेती ही काळाची गरज आहे . सर्वांनी जंगल वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे . जंगली औषधी वनस्पती जतन, संवर्धन व वृद्धी करून जैवविविधता , पर्यावरण संतुलन , निसर्ग संपदा वाढविणे या कामी शासन विभाग , आदिवासी प्रकल्प कार्यालये , वन विभाग , निसर्ग प्रेमी यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कलाकार मंडळींनी आपल्या समृद्ध कला जीवनातून , चित्रपट , लघुपट, पथनाट्यातून , साहित्यिकांनी आपल्या लेखनीतून , गीतांच्या माध्यमातून याचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे.वेगवेगळी संमेलने, मेळावे , निसर्ग जागर व चळवळ वाढविणे गरजेचे आहे . या परिस्थितीत वेगवेगळ्या कृषिविदयापीठांमध्ये बहुगुणी वनस्पती ऊती संवर्धनाची गरज आहे .वनांमध्ये आदिवासी व इतर समुदायांच्या मदतीने दरवर्षी नैसर्गिक वनसंपदेची लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. शालेय अभ्यासक्रम व पाठयक्रमात वनांवरील जीवन अधोरेखित करून बालवयातच निसर्ग संवर्धनाची आवड शालेय विदयार्थ्यांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे .वनस्पती व जंगली प्राणी यांची माहिती व ज्ञानाचा प्रचार व प्रसार करून जनजागृती व प्रबोधनातून वनस्पती व प्राण्यांचा ऱ्हास थांबविणे काळाची गरज आहे. परंपरागत माशांच्या जाती, खेकडे, जलचर, मधमाशा, पक्षी यांच्याही संवर्धनासाठी व वृद्धीसाठी विज्ञानाची जोड दयायला हवी. वनसंपदा वाढविली पाहिजे. ज्यामूळे वनसंपदे बरोबरच धोक्यात आलेले मानवी जीवन समृद्ध होण्यास मदत होईल. धोक्यात आलेल्या मानवी आरोग्यास आटोक्यात आणण्यास वनसंपदेचा महत्वाचा वाटा असल्याने तिच्या संवर्धनाची काळाची गरज बनली आहे .
                                                                          β श्री.अर्जुन चिंधू तळपाडे ( प्राथमिक शिक्षक )
                                                                          β  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी,ता.अकोले, जि. अहमदनगर*

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज:मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१० 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 5 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!