‘गुरुदक्षिणा’ सभागृह म्हणजे गोखले एज्युकेशन सोसायटीने निर्माण केलेले ‘फ्युचर हेरिटेज’-प्रमुख अतिथी मा. आनंद लिमये, अतिरिक्त गृहसचिव, महाराष्ट्र शासन
‘गुरुदक्षिणा’ सभागृह म्हणजे गोखले एज्युकेशन सोसायटीने निर्माण केलेले ‘फ्युचर हेरिटेज’-प्रमुख अतिथी मा. आनंद लिमये, अतिरिक्त गृहसचिव, महाराष्ट्र शासन
‘गुरुदक्षिणा’ सभागृह म्हणजे गोखले एज्युकेशन सोसायटीने निर्माण केलेले ‘फ्युचर हेरिटेज’- प्रमुख अतिथी मा. आनंद लिमये, अतिरिक्त गृहसचिव, महाराष्ट्र शासन
अश्विनी भालेराव – प्रतिनिधी नाशिक
नाशिक, ता .२७ (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा) : गुरुदक्षिणा सभागृह म्हणजे एक आयकॉनिक बिल्डिंग आहे, ती केवळ तिच्या स्थापत्यामुळे नव्हे तर ही वास्तू हितचिंतक, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सगळ्यांच्या भावनांतून साकारलेली ही इमारत आहे. त्यामुळे या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो , ही संस्था केवळ विद्यार्थी घडवित नाही तर चांगला माणूस आणि नागरिक घडवते आहे ,असे प्रतिपादन प्रमुख अतिथी मा. आनंद लिमये, अतिरिक्त गृहसचिव, महाराष्ट्र शासन यांनी केले.
शनिवार दि. २७ मे २०२३ रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा ऑडिटोरियमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. समाजाच्या बांधणीत अनेकविध क्षेत्रातील लोकांचे कार्य असते. प्रशासनाच्या क्षेत्रात माझा प्रवेश झाला याचे संपूर्ण श्रेय माझ्या मेहनतीबरोबरच मला घडवणारी माझी शाळा आणि माझे एचपीटी आर्ट्स महाविद्यालय यांना मी देईन असे ते म्हणाले. गोखले एज्युकेशन संस्थेची धुरा सर डॉ. मो. स. गोसावी यांनी समर्थपणे सांभाळत आहेत. पुढील अनेक वर्षे असंख्य महोत्सव साजरे होतील , असे भरीव काम सरांनी केले आहे. ही वास्तू म्हणजे गोखले संस्थेने उभारलेली फ्युचर हेरिटेज आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यमान आमदार सौ. सीमा हिरे, प्रा. डॉ. देवयानी फरांदे, गोखले एज्युकेशन संस्थेचे सचिव, महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.बी. पंडित, सहखजिनदार डॉ. आर. पी. देशपांडे, संस्थेच्या मानव संसाधन संचालिका डॉ. सौ. दीप्ती देशपांडे, प्रकल्प संचालक डॉ. पी.एम. देशपांडे, आस्थापना संचालक श्री. शैलेश गोसावी, विभागीय सचिव, नाशिक विभागाचे डॉ. राम कुलकर्णी, विभागीय सचिव, मुंबई विभागाच्या डॉ. सुहासिनी संत, ब्रॅंच सेक्रेटरी डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, सौ. मिताली लिमये उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथम कोनशिलेचे अनावरणही करण्यात आले. कार्यक्रमाचा आरंभ एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयातील संगीत विभागाच्या प्रा. सौ. अमृता जाधव-जोशी, विद्यार्थिनी कु. वैष्णवी उदावंत आणि कु. देविका सराफ यांच्या ईशस्तवन आणि सोसायटी गीताने झाला. यानंतर डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अतिथींचा परिचय करून दिला. १०५ वर्षाच्या संस्थेच्या वाटचालीचा त्यांनी यथोचित आढावा घेत संस्थेच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाशिवाय हा प्रकल्प उभा राहणे अशक्य होते असे त्या म्हणाल्या. यानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या मा. आमदार सीमा हिरे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, मी देखील या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे, त्यामुळे संस्थेची १०५ वर्षांची ही गौरवशाली वाटचाल पाहून मला अतिशय अभिमान वाटतो. नाशिक ही कानेटकर, कुसुमाग्रज यांच्यामुळे सांस्कृतिक नगरी तर आहेच शिवाय नामांकित अशा या गोखले एज्युकेशन संस्थेने सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत आपले अविरत अध्यापनाचे काम या नगरीत केले आहे. नाशिकमध्ये महात्मा फुले कलादालन हे गावात एकमेव कलादालन आहे. यामुळे कॉलेज रोड परिसरात सुरू होणारी डॉ. सुनंदाताई गोसावी आर्ट गॅलरी ही नाशिकमधील सर्व कलावंतांसाठी उपयुक्त दालन ठरणार आहे. प्रा. डॉ. देवयानी फरांदे म्हणाल्या की, एज्युकेशन हब कडे वाटचाल करण्यासाठी गोखले एज्युकेशन संस्थेचे योगदान अमाप आहे. नाशिक जिल्ह्याचे वैभव असलेल्या या संस्थेने लाखो आदर्श विद्यार्थी घडवले आहेत. गुणवत्तेत संस्थेने कधीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे गुरुदक्षिणा सभागृहासारखी माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून, योगदानातून साकारलेली ही भव्य वास्तू उभारणे हे महाराष्ट्रासाठी मोठा आदर्श वस्तूपाठ आहे. संस्थेची वाटचाल विशद करणारे तेजोमय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयाला वाहिलेले प्रोसिडिंग, रिझ़ॉनन्स तसेच स्वयंप्रेरणा या ४ पुस्तकांचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले.
आजच्या काळात माणूस घडवणे, कुशल मनुष्यबळ घडवणे हे आव्हानात्मक काम शैक्षणिक क्षेत्रात आहे, असे मत अध्यक्षीय भाषणात सर डॉ. मो. स. गोसावी यांनी व्यक्त केले. गुरुदक्षिणा सभागृहाच्या रूपात लाभलेली माजी विद्यार्थ्यांच्या या गुरुदक्षिणेबाबत कौतुक करत ते पुढे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान आपल्या करिअरमधील ५ वर्षे तरी शिक्षण क्षेत्रास द्यायला हवी म्हणजे बाह्य जगतातील त्यांचा अनुभव पुढच्या पिढीला देऊन ते त्यांच्यासाठी उत्तम मार्गदर्शक ठरू शकतात. गोखले संस्थेत आज जवळपास ८० आजीव सभासद आहेत. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही ९० प्रकारच्या विविध संस्था स्थापन करू शकलो. त्यामुळे आजवरच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय हे माझ्या तमाम आजी- माजी सहकाऱ्यांना, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे आधारस्तंभ देणगीदार, गुरुदक्षिणा सभागृहाचे निर्माण होण्यास योगदान देणारे अनेक कॉन्ट्रॅक्टर्स, संस्थेतील गुणवंत आजी माजी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुग्धा जोशी आणि डॉ. प्रणव रत्नपारखी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुहासिनी संत यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.