“शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ आवश्यक आहे”– ॲड.नितीन ठाकरे
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार: दि.10 ऑक्टोबर 2023
β⇒ त्र्यंबकेश्वर, ता.10 ( प्रतिनिधी : प्रा.समाधान गांगुर्डे, ) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथे ” बास्केटबॉल क्रीडांगण ” व “आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल (मुली)” स्पर्धेचे उदघाट्न कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी म.वि.प्र.समाजाचे निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार, निफाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब शिंदे , नाशिक जिल्हा क्रीडा समिती प्रमुख दीपक कांडेकर, डॉ.दीपक जुंद्रे,आदिसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे व म.वि.प्र. समाजाचे निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख हे होते .
उद्घाटन प्रसंगी बोलतांना मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे म्हणाले की “शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने मैदानाचा उपयोग केला पाहिजे, खेळामुळे शरीर तंदुरुस्त व आरोग्यमय राहते , म्हणून खेळ अत्यावश्यक आहे . दुर्गम,आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व संधी उपलब्ध व्हावी , म्हणून स्पर्धा घेणे आवश्यक आहे. बास्केटबॉल हा सांघिक खेळ खेळताना सर्व खेळाडूंना सांघिक भावनेतून खेळावा लागतो. प्रचंड ऊर्जा लागणाऱ्या या खेळात मिळणारा विजय किंवा पराजय हा वैयक्तिक नसून संपूर्ण संघाचा असतो.बास्केट बॉल कोर्टचा नित्य वापर करून खेळाडू महाविद्यालयाचे व संस्थेचे नाव उज्ज्वल करतील, याची मला खात्री आहे.”असे प्रतिपादन सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व मविप्र संस्थेचे निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, “महाविद्यालय फक्त पुस्तकी ज्ञानदानाचे काम करत नाही, तर ते विद्यार्थ्यांना नवी दिशा दाखवत असते. विद्यार्थ्यांना खेळामधूनच अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधी देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे संस्था अशा उपक्रमांसाठी सदैव प्रयत्नशील असते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार म्हणाले , की बास्केटबॉल या लोकप्रिय खेळाने संपूर्ण जगाला भुरळ घातलेली आहे. कमी खर्चिक असलेला हा खेळ मनोरंजक आहे. ग्रामीण भागात हा खेळ रुजतोय, ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. मविप्र संस्था आणि क्रीडा विभागाच्या प्रयत्नांतून साकारलेल्या या क्रीडांगणामुळे विद्यार्थ्यांना बास्केटबॉल खेळात ओळख निर्माण करण्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म मिळाला आहे.त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत . त्यांनी “बास्केटबॉल या खेळाचा इतिहास सांगून महाविद्यालयाच्या विविध कामांचा आढावा घेतला.
सदर स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील १७ संघ व १४९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यास्पर्धेचा पहिला उपांत्य फेरीचा सामना एच.पी.टी महाविद्यालय नाशिक विरुद्ध क.का. वाघ इंजीनियरिंग महाविद्यालय नाशिक यांच्यामध्ये झाला. यास्पर्धेत क.का. वाघ इंजीनियरिंग महाविद्यालय नाशिक संघाने 14 विरुद्ध 4 अशा गोलफरकाने एच.पी.टी. महाविद्यालय नाशिकचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. तर दुसरा उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये के.टी.एच.एम.महाविद्यालयाने बिटको महाविद्यालय नाशिकरोडचा 15 विरुद्ध 5 अशा गोलफरकाने पराभव करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. अत्यंत चुरशीचा खेळला गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये के.टी.एच.एम.महाविद्यालयाने क.का. वाघ इंजीनियरिंग महाविद्यालय नाशिक या संघाचा 24 विरुद्ध 12 गोल असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत आंतरविभागीय स्पर्धेसाठी चंद्रशेखर आगाशे महाविद्यालय, गुलटेकडी, पुणे येथे गुरुवार दिनांक 12 व 13 ऑक्टोबर २०२३ रोजी होणाऱ्या स्पर्धेमध्ये नाशिक विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते इंग्रजी विभागामार्फत भित्तीपत्रक स्पर्धेचे उद्घाटन व महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले, याप्रसंगी मविप्र समाजाचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पिंगळे, सेवक संचालक सी.डी.शिंदे, माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांनी स्पर्धास्थळी भेट देऊन खेळाडूंशी हितगुज करत शुभेच्छा दिल्या त्यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .
महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.भागवत महाले यांना गाईड्शिप मिळाल्याबद्दल व डॉ.जया शिंदे यांना पीएच.डी मिळाल्याबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे सेवक कैलास गायकवाड,शरद लोखंडे, भगवान करवर , दीपक मेढे , शाळेच्या सेविका श्रीमती लीला चव्हाण, श्रीमती मंजुळा फसाळे यांचा स्वच्छता दूत म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास निफाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब शिंदे , नाशिक जिल्हा क्रीडा समिती प्रमुख दीपक कांडेकर, डॉ.दीपक जुंद्रे, उपप्राचार्य डॉ.शरद कांबळे, डॉ.राजेश झनकर, प्रा.उत्तम सांगळे, प्रा.समाधान गांगुर्डे, प्रा.संदीप गोसावी, डॉ.संदीप निकम, डॉ. अजित नगरकर, डॉ .भागवत महाले, डॉ. संदीप माळी, प्रा.प्रशांत रनसुरे, प्रा.ललिता सोनवणे , कनिष्ठ महाविद्यालय श्रीमती विद्या जाधव,प्रा.अनिल खेडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील क्रीडा संचालक, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दिनेश उकिर्डे व आभार प्रदर्शन श्रीमती निता पुणतांबेकर यांनी केले.
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०