β : नाशिक :⇔ “उच्च शिक्षणाचे मुख्य ध्येय ज्ञाननिर्मिती” – य.च.म.मु. विद्यापीठ कुलगुरू: डॉ. संजीव सोनवणे – (प्रतिनिधी : अश्विनी भालेराव )
β : नाशिक :⇔ "उच्च शिक्षणाचे मुख्य ध्येय ज्ञाननिर्मिती" - य.च.म.मु. विद्यापीठ कुलगुरू : डॉ. संजीव सोनवणे - (प्रतिनिधी : अश्विनी भालेराव )
“उच्च शिक्षणाचे मुख्य ध्येय ज्ञाननिर्मिती “: डॉ. संजीव सोनवणे
शैक्षणिक प्रशासन आणि व्यवस्थापन परिषदेचे नाशकात उद्घाटन
(महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन परिषद, पुणे आयोजित ‘ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२०’ या विषयावर आयोजित परिषदेच्या उद्घाटन सत्रात सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या भाषणांवर आधारित तेजपर्व या ग्रंथाचे प्रकाशन करताना डॉ. संजीव सोनवणे, दीप्ती देशपांडे, डॉ. कल्लुरकर, डॉ. के. आर. शिंपी, प्राचार्या डॉ. एम. डी. देशपांडे.)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक : शनिवार : दि. 9 डिसेंबर 2023
β⇔ नाशिक, ता 9 (प्रतिनिधी : अश्विनी भालेराव ) :- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार असून, या धोरणात उच्च शिक्षणाचे मुख्य ध्येय हे ज्ञाननिर्मिती हेच आहे. या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आधी धोरणाचा आत्मा नीट समजावून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी शनिवारी येथे केले. महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन आणि व्यवस्थापन परिषद, पुणे या संस्थेची ३१ व्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा संकुलतील प्रिं. टी. ए. कुलकर्णी सभागृहात झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजीव सोनवणे बोलत होते.
गोखले एज्युकेशन सोसायटी आणि डॉ. एमएसजी फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद भरविण्यात आली असून, शताब्दी साजरी करत असलेल्या एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयाकडे परिषदेचे यजमानपद आहे. महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन परिषद, पुणे यांच्या ‘शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापनाची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० च्या अंमलबजावणीमधील भूमिका ‘ या विषयावर परिषदेत चर्चा होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे होत्या. प्रख्यात अभियांत्रिकी तज्ज्ञ डॉ. एस. पी. कल्लुरकर, परिषदेचे सचिव डॉ. के. आर. शिंपी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. संजीव सोनवणे पुढे बोलतांना म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणामुळे संपूर्ण शिक्षण होणार्या बदलाचे नेतृत्व करणारे सक्षम प्रशासन गरजेचे आहे. या धोरणात परिपूर्ण शिक्षणाचा विचार पुढे येत आहे. त्यासाठी विविध नवीन कौशल्यांची आणि शिक्षणपद्धतींची गरज लागणार आहे, असेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले .
गोखले एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी महाराष्ट्र शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन परिषदेला एका वेगळ्या उंचीवर नेले आणि एक चळवळ निर्माण केली, असे प्रतिपादन डॉ. दीप्ती देशपांडे यांनी केले. नवीन शैक्षणिक धोरण हे अत्यंत योग्य वेळेला तयार झाले आहे. यातील अनेक गोष्टी स्पष्ट होत आहे. सध्याच्या व्यवस्थेतील मर्यादा लक्षात घेऊन पुढे जावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. डॉ. गोसावी यांनी उच्च शिक्षण क्षेत्राला प्रगल्भ नेतृत्व दिले असे गौरोद्गार डॉ. कल्लुरकर यांनी काढले. शैक्षणिक धोरणाशी संबंधित प्रशासन विषयावर सर्व आयामांनी विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. एम. डी. देशपांडे यांनी उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक आणि अतिथींचा परिचय करून दिला. डॉ. के. आर. शिंपी यांनी परिषद तसेच अन्य आयोजक संस्थांची माहिती दिली. यावेळी एज्युकेअर, तेज:पर्व आणि परिवर्तन या विशेष ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन सत्राचे आभार परिषदेचे सहसचिव डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. स्नेहा रत्नपारखी आणि डॉ. मुग्धा जोशी यांनी केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमप्रसंगी डॉ. आर. पी. देशपांडे, डॉ. सुहासिनी संत, डॉ. राम कुलकर्णी, श्री. शैलेश गोसावी, श्री. कल्पेश गोसावी, डॉ. लोकेश शर्मा, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. आशिष चौरासिया आदी उपस्थित होते. या निमित्ताने एक भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला मान्यवरांसह प्राध्यापक, प्रतिनिधींनी भेट दिली.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : डॉ. भागवत महाले : मो .८२०८१८०५१०