सूनंदाताई गोसावी कला दालानाचे २१ ऑगस्ट रोजी उद्घाटन
⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: शनिवार, 17 ऑगस्ट 2023
⇒नाशिक ,17 ( प्रतिनिधी : छाया लोखंडे -गिरी ):- येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात नव्याने सुरू होणाऱ्या सुनंदाताई गोसावी कलादालनाचे उद्घाटन सोमवार दिनांक २१ ऑगस्ट सकाळी ११ वा. प्रसिद्ध चित्रकार पंडित खैरनार यांच्या हस्ते होणार आहे.
नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच कॉलेज रोडवर असलेल्या या कलादालनाचा उद्देश नाशिकच्या बाहेरील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचे चित्र प्रदर्शन आयोजित करणे , चित्रकला, शिल्पकला, छायाचित्र या कलांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभरातील मोठ्या कला दालनांसारखे सारखे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. यावेळी नाशिकच्या कलाक्षेत्रात मोठे योगदान असणाऱ्या स्व. वा.गो. कुलकर्णी, शिल्पकार मदन गर्गे आणि निसर्ग चित्रकार शिवाजी तुपे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.याचबरोबर एस एम आर के महाविद्यालयातील दृश्यकला विभागाच्या विद्यार्थिनीं तसेच प्राध्यापकांच्या रंग स्पर्श या प्रदर्शनाचे आयोजन आणि प्रसिद्ध कलाकारांची निसर्ग चित्रण, व्यक्तिचित्रण यांची प्रात्यक्षिके आणि संवाद सत्र यांचे आयोजन करण्यात आले आहे .
नाशिकच्या कलाक्षेत्रात योगदान देणारे चित्रकार, शिल्पकार ,आर्किटेक्ट ,इंटिरियर डिझायनर यांचाही गौरव संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. नव्यानेच उभारण्यात आलेल्या गुरुदक्षिणा सभागृहाच्या प्रांगणात असलेले हे वातानुकूलित कलादालन सर्व प्रकारच्या सोयीसुविधांनी युक्त असून नाशिकच्या बाहेरून येणाऱ्या कलावंतांची निवास व्यवस्था ही येथे करण्यात आली आहे , तसेच कलेच्या विद्यार्थ्यांसाठी हे कलादालन सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणार असल्याचे एस एम आर के महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच गोखले एज्युकेशन संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे यांनी सांगितले असून कला रसिकांनी कलादालनास भेट द्यावी असे आवाहन केले आहे.