





नाफेड भ्रष्टाचार प्रकरण: केंद्र सरकारच्या हस्तकांद्वारे चौकशी दडपण्याचा प्रयत्न

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 06 ऑक्टोबर 2024
β⇔ वणी(नाशिक ), ता.06 ( प्रतिनिधी : सुरेश सुराशे ):-साधारण १० सप्टेंबर रोजी, शेतकरी संघर्ष सभेच्या शिष्टमंडळाने नाफेडच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जाब विचारण्यासाठी नाफेड कार्यालयात धडक दिली. येवला येथील एका शेतकऱ्याने नाफेडच्या गैरव्यवहारांविरोधात थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर, या तक्रारीची चौकशी करण्यासाठी नाफेडच्या पश्चिम विभागीय प्रमुख विना कुमारी यांच्या नेतृत्वाखालील पथक नाफेड कार्यालयात दाखल झाले होते.
शेतकरी संघर्ष सभेने नाफेड आणि एनसीसीएफमध्ये होत असलेल्या घोटाळ्याची माहिती दिली व काही कंपन्यांचे री-ऑडिट करण्याची मागणी केली. प्रारंभी, विना कुमारी यांनी ही मागणी फेटाळून लावली, परंतु नंतर चर्चेनंतर ती मागणी मान्य केली. शेतकरी संघर्ष सभेने तीन कंपन्यांची नावे दिली: मल्टिस्टेट प्रोटीस्ट, ऑरगॅनिको, आणि ध्येयपूर्ती. री-ऑडिटसाठी १०-१५ दिवसांची वेळ मागून विना कुमारी यांनी आश्वासन दिले. चर्चेदरम्यान, विना कुमारी यांनी सांगितले की नाफेडचा स्टॉक थांबवणे शक्य नाही आणि संशय असल्यामुळे नाशिक भागातील ११० कोटी रुपयांची रक्कम रोखण्यात आली आहे, पण त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याचे सांगितले. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यानंतर तीन आठवडे उलटून गेल्यावर, चौकशीबाबत विचारणा करण्यासाठी शेतकरी संघर्ष सभा पुन्हा कार्यालयात पोहोचली, तेव्हा कळले की कोणतीही चौकशी झालेली नाही. ब्रांच मॅनेजर पादडे यांच्या फोनवरून विना कुमारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी री-ऑडिट करण्यास नकार दिला व शेतकऱ्यांना कोणतीही माहिती देण्यास बांधील नसल्याचे स्पष्ट केले. माहिती हवी असल्यास भारत सरकारकडे जाण्याचा सल्ला देत त्यांनी उर्मट उत्तर दिले.
शेतकरी संघर्ष सभेच्या किरण सानप यांनी आरोप केला की नाफेडचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी आणि सत्तेतील अनेक लोकांचे हात यात असल्यामुळे प्रकरण दडपले जात आहे. विधानसभेपूर्वी नाफेडचा बफर स्टॉक संपवून हे प्रकरण मिटवण्याचा सरकार आणि नाफेड अधिकाऱ्यांचा कट आहे, असे सानप यांनी सांगितले.
शेतकरी संघर्ष सभेचे नेते सुनील मालुसरे यांनी इशारा दिला की, जर माहिती देण्यात आली नाही किंवा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला तर जिल्हाभर आंदोलन छेडले जाईल. या बैठकीला किरण सानप, सुनील मालुसरे, प्रभाकर धात्रक, धर्मराज शिंदे, अशोक गायधनी, राजेंद्र ठोंबरे, शांताराम राजनोर, ज्ञानेश्वर काळे, संतोष मार्कंड, सुरेश सुरासे आदी शेतकरी नेते उपस्थित होते.

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )