





उंबरठाण शाळेत इंगळे व भोये सरांना निरोप
दिव्य भारत बी एस एम न्यूज : बोरगांव प्रतिनिधी : लक्ष्मन बागुल
बोरगांव -सुरगाणा, ता .१३ (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ): – जिल्हा परिषद आदर्श शाळा उंबरठाण येथील शिक्षक सतीश इंगळे व राजेश भोये सरांना ग्रामस्थ, पालक, सहकारी शिक्षक व विद्यार्थी यांनी सन्मानपूर्वक निरोप दिला. या वेळी सारा गाव भावुक झाल्याचे पहावयास मिळाले. जिल्हा परिषद शिक्षक म्हटला की 10 ते 5 अशी कामाची वेळ पाळणारे शिक्षक दिसतात, पण सतीश इंगळे व राजेश भोये हे त्याहून अगदी वेगळे होते.
जिल्हा परिषदने या शाळेला दिलेला पहिला शिक्षक हे सतीश इंगळे होते. वस्ती शाळेपासून ते आदर्श शाळा हा शाळेचा प्रवास याच चौदा वर्षातील आहे. गेली 14 वर्षे त्यांनी विद्यार्थी सर्वांगीण विकास व गुणवत्ता, मिशन नवोदय, मिशन स्कॉलर, मिशन एकलव्य रेसिडेन्सि स्कूल, कोविड काळात ओट्यावरची शाळा, क्रीडास्पर्धा व वकृत्व स्पर्धेतील तालुका, जिल्हा पातळीवरील विद्यार्थ्यांचे यश, शाळेच्या भौतिक सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहल असे विविध उपक्रम राबवून प्रत्येक पालक व ग्रामस्थांच्या मनात घर केले होते. इंगळे सरांचे 11 विद्यार्थी नवोदय पात्र झाले. 26 विद्यार्थी महाराष्ट्र शासनची शिष्यवृत्ती पात्र झाले. 34 विद्यार्थ्यांना मॉडेल एकलव्य रेसिडेन्सि स्कूलला प्रवेश मिळाला.
कोविड काळातील ओट्यावरची शाळा या उपक्रमाला जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळाला. अनेकांना आयुष्यभर नोकरी करून सेवापूर्तीच्या शेवटच्या दिवशीसुद्धा असे प्रेम मिळत नाही, ते इंगळे सरांनी 14 वर्षात त्याच्या वयाच्या ऐन पस्तीशीत मिळविले. मूळचे बीडचे असलेले इंगळे सर जेव्हा या आदिवासी ग्रामीण भागात शिक्षक म्हणून नोकरीला लागले, इथले ग्रामीण विद्यार्थी, गाव, गावातील ग्रामस्थ जेव्हा त्यांनी पहिल्यांदा बघितले तेव्हाच त्यांनी ठरवले होते की माझी खरी गरज इथे आहे. पुढे त्यांनी उंबरठाणचे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ हेच माझे कुटुंब मानून गावासाठी खूप काही केले. अनेक उपक्रम राबवून त्यांनी गावातील लोकांची मने जिंकली. या इंगळे व भोये सरांच्या प्रेमापोटी, आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती आपल्यातून सोडून चालली आहे म्हणून, जशी एखादी मुलगी लग्न होऊन सासरला जाते. तसा सन्मानपूर्वक निरोप उंबरठाणच्या ग्रामस्थांनी इंगळे व भोये सरांना दिला.
कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य माधव पवार, पेसा कमिटी अध्यक्ष सुरेश चौधरी, यशवंत बाबा जाधव, प्राचार्य सिताराम पवार, मधुकर खोटरे, शिक्षणप्रेमी लक्ष्मण खोटरे, किसन पवार, माधव गायकवाड, हिरामण पवार, पांडुरंग पवार, सिताराम पवार, गोपाळ पवार, मधुकर देशमुख, रमण जाधव, जयवंत भोये, कैलास धुम हे उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मनीषा देशमुख, मुख्याध्यापक लक्ष्मण बागुल, शिक्षक जयराम धुम, राजेंद्र गावित, मंजुळा गावित, सुमित्रा जाधव, संगीता भोये, राहुल सावळे, योगिता महाले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले, मो .८२०८१८०५१०