





राजकीय पुढाऱ्यांनो वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चर्चा करा;राजकारण नको!

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 13 फेब्रुवारी 2024
β⇔ नागपूर, दि.12 (प्रतिनिधी : रमेश लांजेवार):- राज्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वेगवेगळे रूप धारण करून वाढत आहे ही बाब सर्वसामान्यांच्या दृष्टीने व राज्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे.याचे जिवंत उदाहरण सर्वांसमोर आहे.परंतु राज्यात पक्ष-विपक्ष गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या चर्चेपेक्षा राजकारण कसे करता येईल व आपली राजकीय पोळी कशी शेकता येईल याकडे संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष लागल्याचे दिसून येते.यामुळे सर्वसामान्यांचा राजकीय पुढाऱ्यांवरून विश्वास कमी होऊ शकतो याला नाकारता येत नाही.
नुकतेच कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये व्दारली येथील एका जमिनीच्या मुद्यावरून दिनांक २ फेब्रुवारी शुक्रवारला पोलिस ठाण्यातच झालेला वाद विकोपाला गेला.या वादात आमदार गणपत गायकवाड यांनी थेट हिललाइन पोलिस ठाण्यामधील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला.यावरून स्पष्ट होते की आमदार (लोकप्रतिनिधी) ची गुन्हेगारी करण्याची हिंमत वाढल्याचे दिसून येते.कारण पोलिस ठाण्यात बंदुकीने अंधाधुंद गोळीबार करणे म्हणजेच गुंडगिरीला प्रोत्साहन देणे होय,याला आमदार (लोकप्रतिनिधी) म्हणता येणार नाही.अशा अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या सरकारने आवरायला पाहिजे व पोलिस विभागाला अशांवर कारवाई करण्याची खुली सुट द्यायला हवी.ठाण्याची घटनेला काही दिवस होत नाही तर,त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला मुंबईत दिसून आली.कारण ठाण्यातील पोलिस ठाण्यात भाजप आमदाराने केलेल्या गोळीबाराचा धक्का कायम असतांनाच बोरिवलीमधील एका स्थानिक कार्यकर्त्यांने दिनांक ९ फेब्रुवारीला शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. साडीवाटपाच्या कार्यक्रमासाठी बोलावून मॅरिस नरव्होना या कार्यकर्त्यांने घोसाळकर यांच्यासमवेत “फेसबुक लाइव्ह”केला व नंतर अभिषेक यांच्यावर दोन-तीन गोळ्या झाडल्या यानंतर याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. म्हणजेच गुन्हेगारी कोणत्याही प्रकारची असो ती गुन्हेगारीच म्हणावी लागेल.याकरीता राज्यातील संपूर्ण राजकीय पुढाऱ्यांनी पक्ष-विपक्षांनी एकत्र येऊन या विषयावर सविस्तर चर्चा करने अत्यंत गरजेचे आहे.
कारण सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर विषय आहे.त्याचप्रमाणे राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पोलिस विभागाला आपण काय मदत करु शकतो अशा पध्दतीची सर्वोतोपरी मदत करण्याचा विचार करायला पाहिजे.कारण राज्यात किंवा देशात गुन्हेगारीची मुख्य जड ही राजकाणातुनच निर्माण होत असते.त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांनी कोणत्याही गुन्हेगारीचे किंवा गुन्हेगारांचे राजकारण करून व त्यांना खतपाणी देणे सर्वप्रथम बंद केले पाहिजे व राज्याच्या किंवा देशाच्या सुरक्षा यंत्रणेला सर्वतोपरी मदत करायला हवी. राजकीय पुढारी जर सुरक्षा यंत्रणेला मदत करणार नाही तर पोलिस विभाग काय करेल याचाही विचार सरकार,पक्ष-विपक्षांनी केलाच पाहिजे. पोलिस विभाग गुन्हेगारांना मोठ्या कठीण प्रसंगातून आपल्या जीवाची पर्वा न करता पकडतात व त्यांच्या कायदेशीर कारवाई करतात.परंतु राजकीय पुढारी गुन्हेगारांना खतपाणी घालतात हे राज्यात सध्याच्या परिस्थितीत घडत असलेल्या घटनेवरून लक्षात येते.त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्याकरीता पोलिस विभागाला कडक कारवाई करण्याकरीता सरकारने खुली सुट द्यायला हवी तेव्हाच गुन्हेगारीवर आळा बसेल.
लेखक :-
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510