विश्वजित थविल ला राज्य बॅडमिंटनचा दुहेरी मुकुट , राष्ट्रीय स्पर्धेसाठी
महाराष्ट्र संघात निवड
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि.16 नोव्हेंबर2023
β⇔बोरगाव , ता.19 ( प्रतिनिधी : लक्ष्मन बागुल ) :- रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सुरगाणा तालुक्यातील गारमाळ येथील विश्वजित थविल याने १३ वर्षांखालील गटात एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट प्राप्त केला. त्याच्या या विजयामुळे त्याची भुवनेश्वर येथे २१ ते २६ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्य संघात निवड निश्चित झाली आहे.
रत्नागिरी येथे झालेल्या गद्रे प्रेझेंट्स योनेक्स सनराइज राज्यस्तरीय स्पर्धेच्या १३ वर्षांखालील गटाच्या अंतिम लढतीत नाशिकच्या विश्वजित थविल याने मयूरेश भुतकी याचा २१-१७, २१-५ अशा सरळ गेममध्ये पराभव केला. मयूरेश भुतकीच्याच साथीसह त्याने दुहेरीमध्येही सयाजी शेलार व उदयन देशमुख या जोडीचा २२-२४, २१-१५, २१-१९ असा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. या लढतीत तिसऱ्या गेममध्ये ४-१४ अशा पिछाडीवर असताना विश्वजित व मयूरेशने १८-१५, १९-१७ अशी आघाडी घेत २०-१९, २१- १९ अशा गेमने लढत जिंकली होती.
विश्वजितने एकेरीच्या पहिल्या फेरीत ध्रुव दाभाडेचा २१-०, २१-६ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत आर्यन नागवडेचा २१-७, २१-६, तिसऱ्या फेरीत आशर शेखचा २१-७, २१-१६,तर चौथ्या फेरीत दिविक गर्गचा २१-७, २१-६ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत विश्वजितने सयाजी शेलारचा २१-१५, २१-१७ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या फेरीत विश्वजितने चिन्मय फणसेचा ११-२१, २१-१४ आणि २१-१५ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
या कामगिरीमुळे विश्वजितची महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे. त्याने गेल्याच आठवड्यात हैदराबाद येथे झालेल्या ऑल इंडिया रँकिंग टुर्नामेंटमध्ये मयूरेशच्या साथीने उपविजेतेपद प्राप्त केले होते. विश्वजित दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत आहे. त्याला शिवसत्य क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक मकरंद देव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या कामगिरीबद्दल विश्वजितचे शिवसत्य क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो.८२०८१८०५१०