‘विविध समस्या सोडविण्यासाठी विविधता अंतर्भूत असलेली टीम अत्यावश्यक आहे ‘- प्रा. डॉ. ज्योत्स्ना वाघमारे
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 27 फेब्रुवारी 2024
β⇔नाशिकरोड,दि.27(प्रतिनिधी : संजय परमसागर) :- रसायनशास्त्रातील सर्वोच्च संस्था “इंटरनॅशनल युनियन आँफ प्युअर अँड अप्लाईड केमिस्ट्री” यांच्या वतीने ‘ग्लोबल वुमेन्स ब्रेकफास्ट २०२४’ अंतर्गत विज्ञानातील विविधतेचे सक्षमीकरणासाठी नाशिकरोड महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग, आय. क्यू. ए. सी. आणि असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर यांचे संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानक्षेत्रातील विविधतेचे उत्प्रेरक’ या विषयावर गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन वेबिनारचे आयोजन २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. करण्यात आले होते.
या वेबिनारसाठीच्या प्रमुख मार्गदर्शक इन्स्टिटय़ूट ऑफ़ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा, मुंबई येथील प्रा. डॉ ज्योत्स्ना वाघमारे म्हणाल्या , की संशोधन म्हणजे विविध समस्यांची सोडवणूक होय. सध्याच्या परिस्थितीत विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, गणित (STEM) क्षेत्रातील महिलांचा वाढलेला सहभाग हा सावित्री बाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याच महिलांसाठीच्या शिक्षण क्षेत्रातील मूलभूत कार्यामुळे साध्य झाला आहे. भारतातील पदवीधर महिलांची संख्या ही ईतर देशांच्या तुलनेत सर्वात अधिक असली , तरी पदव्युत्तर पदवी स्तरावर फक्त १४ टक्के आहे. अजुनही महिलांना भेडसावणाऱ्या घरकाम, सुरक्षितता, कामाच्या ठिकाणी असलेल्या गैरसोयी अश्या सारख्या विविध अडचणींमुळे संशोधन क्षेत्रात आघाडी घेता आली नाही, त्यावर पर्याय शोधणे गरजेचे आहे. समाजात असलेल्या विविध समस्या सोडविण्यासाठी टीम गरजेची आहे, तथापि एकजिनसी टीम ऐवजी विविधता अंतर्भूत असलेली टीम अत्यावश्यक आहे ,अश्या त्या म्हणाल्या. संशोधन क्षेत्रात यशस्वी होवून कीर्तिमान झालेल्या मेरी क्युरी, रोझालिंड फ्रँकलीन, ग्लॅडी वेस्ट, टेस्सी थाॅमस, रोहिणी गोडबोले आणि सुधा मूर्ती या महिला शास्त्रज्ञांनी अडचणींचा बाऊ न करता कशा प्रकारे यश संपादन केले या बाबत उपस्थितांना प्रेरणा दिली. त्यांनी बघितलेल्या स्वप्नांमुळेच एवढे उत्तुंग यश त्या प्राप्त करू शकल्या असेही त्या म्हणाल्या.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या आणि रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत करून या प्रसंगी मनोगत व्यक्त केले. वेबिनारचे समन्वयक प्रा. डॉ सुदेश घोडेराव यांनी वेबिनारचे प्रास्ताविक करतांना ग्लोबल वुमेन्स ब्रेकफास्ट संकल्पना, असोसिएशन ऑफ केमिस्ट्री टीचर या संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. वेबिनारचे सूत्रसंचालन प्रा डॉ मीनाक्षी राठी, पाहुण्यांचा परिचय प्रा डॉ दीपक बोरस्ते यांनी तर आभार प्रदर्शन प्रा माधुरी हांडोरे यांनी केले. या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी सायन्स विभागाचे समन्वयक प्रा डॉ कल्याणराव टकले आणि संयोजन समितीचे सदस्य प्रा डॉ सतीश चव्हाण, प्रा वसीम बेग, प्रा डॉ विशाल माने, प्रा डॉ दीपक टोपे, प्रा प्रीतम शेटे, प्रा संदीप पिंगळे, प्रा रुपाली मोरे यांनी परिश्रम घेतले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510