दिव्य भारत बीएसएम न्यूज :मंगळवार : दिनांक : २ जून २०२६

बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना
पालघर,(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):- दि. 30 मे 2026 : महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून बहाडोली गावासाठी वन विभागामार्फत “बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग” हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करण्यात आला असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देत गावाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे.
बहाडोली ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित ग्रामसभेस पालघर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) सुशील नांदवटे, संबंधित वनपाल, वनरक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सचिव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. तथापि, ग्रामसभेस आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांना वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील नांदवटे यांनी बहाडोली जांभूळ फळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बहाडोली गावामध्ये सुमारे 60 ते 70 टक्के शेतकरी जांभूळ उत्पादक असून गावाच्या अर्थकारणामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जांभूळ हंगामाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असला तरी हंगामाच्या शेवटी बाजारभाव घसरल्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसेच नैसर्गिक आपत्ती, मागणी व पुरवठ्यातील असमतोल यामुळे देखील शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर जांभूळ फळाचे मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांकडून जांभूळाची थेट खरेदी करण्यात येणार असून खरेदी प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची थकबाकी न ठेवता शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला देण्यात येणार आहे. उद्योग उभारणीच्या तसेच संचालनाच्या कालावधीत स्थानिक युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे.उद्योगामध्ये जांभूळ प्रक्रिया, ग्रेडिंग, उत्पादन निर्मिती, पॅकिंग व साठवणूक यांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येणार असून सुमारे 6000 ते 8000 चौ. फूट क्षेत्रामध्ये प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच तज्ञ, तंत्रज्ञ व कुशल मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांचे मानधन कंपनीमार्फत अदा केले जाणार आहे.
उद्योगाचे व्यवस्थापन प्रारंभीच्या पाच वर्षांसाठी अनुभवी व पात्र संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. Food Licence, Preservatives, Company Act, कामगार कायदे, विपणन (Marketing), आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तसेच विविध तांत्रिक व कायदेशीर बाबींचा विचार करून उद्योगाचे व्यावसायिक पद्धतीने संचालन करण्यात येणार आहे. उद्योग स्थिर झाल्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन समिती (JFMC) सक्षम झाल्यास उद्योग व्यवस्थापन हस्तांतरणाबाबत निर्णय घेण्यात येईल.उद्योगाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी ग्रामसभेमार्फत स्वतंत्र समन्वय व देखरेख समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच उद्योगाचा मासिक प्रगती अहवाल व आर्थिक व्यवहारांची माहिती JFMC समितीस सादर करण्यात येईल. दरवर्षी ग्रामसभेमध्ये उद्योगाच्या कामकाजाचा लेखी अहवाल सादर केला जाणार आहे.प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी उद्योगाचा ताळेबंद तयार करण्यात येणार असून निव्वळ नफ्याच्या नियमानुसार वाटप करण्यात येईल. शासन निर्णयानुसार JFMC समितीस प्राप्त होणारा हिस्सा गाव विकासासाठी वापरण्यात येणार असून ग्रामसभेच्या ठरावानुसार ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामे राबविण्यात येतील.
सदर प्रकल्पामुळे बहाडोली गावातील जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी आणि गावाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.अशी माहिती पालघर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) सुशील नांदवटे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली.यावेळी ग्रामसभेला उपस्थित राहून बहाडोली जांभूळ फळप्रक्रिया उद्योग प्रकल्पाबाबत सविस्तर मार्गदर्शन व संपूर्ण माहिती दिल्याबद्दल उपसरपंच राहुल पाटील यांनी ग्रामपंचायत बहाडोलीच्या वतीने पालघर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) सुशील नांदवटे तसेच उपस्थित वनपाल, वनरक्षक व वन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून सदर प्रकल्प यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.“बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पामुळे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी आणि गावाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने हा प्रकल्प राज्यातील एक आदर्श ग्रामीण मूल्यवर्धन उद्योग म्हणून विकसित करण्यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे.” असे पालघर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक), सुशील नांदवटे यांनी सांगितले.

