β : नागपूर:⇔निसर्गमित्र गिधाडांची घटती संख्या : एक चिंताजनक स्थिती-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार)
β : नागपूर:⇔निसर्गमित्र गिधाडांची घटती संख्या : एक चिंताजनक स्थिती-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार)
निसर्गमित्र गिधाडांची घटती संख्या : एक चिंताजनक स्थिती
आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिवस
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 08 सप्टेंबर 2024
β⇔नागपूर,दि,08 (प्रतिनिधी : रमेश लांजेवार ) दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील पहिला शनिवार आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस ७ सप्टेंबर २०२४ रोजी साजरा होत आहे. हा जागतिक उपक्रम गिधाडांच्या संरक्षणासाठी समर्पित असून, हे पक्षी आपल्या पर्यावरणातील अनमोल नायक आहेत. अनेकदा गैरसमज आणि नकारात्मक अर्थांशी जोडले जाणारे हे पक्षी प्रत्यक्षात पर्यावरणाचे रक्षक आहेत. मात्र, त्यांच्या अधिवासात वाढणाऱ्या धोक्यांमुळे त्यांची संख्या चिंताजनकरीत्या घटत आहे.
देशात दिवसेंदिवस प्रदूषणाची पातळी वाढत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिकीकरण, जंगलतोड, नैसर्गिक आपत्ती आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे निसर्गाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. गिधाड, जे मृत जनावरांचे मांस खाऊन निसर्गातील संतुलन राखतात, त्यांची घटती संख्या पर्यावरणासाठी गंभीर संकट निर्माण करत आहे. भारतातील ९०% गिधाडांची संख्या घटल्याने निसर्गावर मोठे संकट आले आहे, आणि या परिस्थितीत त्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. भारतामध्ये ६ देशी आणि ३ स्थलांतरित गिधाडांच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. १९८०च्या दशकात गिधाडांची संख्या ४० दशलक्ष होती, मात्र डायक्लोफेनॅक सारख्या विषारी औषधांच्या वापरामुळे, केवळ १५-२० वर्षांतच ९०% गिधाडे नष्ट झाली. काही प्रजाती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
पूर्वी गिधाडांना मृत जनावरांचे जे मांस मिळायचे ते पोषक असायचे, पण अलीकडच्या काळात जनावरांना विविध रोगांपासून वाचवण्यासाठी औषधे आणि इंजेक्शन दिली जातात. यामुळे जनावरांचे मांस विषारी बनते, आणि ते खाणाऱ्या गिधाडांना अनेक रोगांचा सामना करावा लागतो. यामुळे गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे, आणि ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. १९९३ ते २००७ दरम्यान पांढऱ्या पुठ्याचे गिधाड ९९.९% प्रमाणात नष्ट झाले आहेत. तसेच भारतीय गिधाड आणि निमुळत्या चोचीच्या गिधाडांची संख्या ९९% ने घटली आहे. या घटनेमुळे निसर्गाचे संतुलन राखणाऱ्या गिधाडांचे नामशेष होण्याचे भय निर्माण झाले आहे.
गिधाडांच्या संवर्धनासाठी भारत सरकार आणि विविध संस्थांनी आता युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. २०२० ते २०२५ दरम्यान गिधाड संवर्धनाच्या कृती आराखड्यानुसार, महाराष्ट्र वनविभागाने भारतीय गिधाड फाउंडेशनच्या सहकार्याने गिधाड संवर्धन केंद्रे स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, आणि याचे स्वागत करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिनाच्या निमित्ताने, गिधाडांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने अधिक प्रयत्न करावे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांनी वनविभागाच्या सहकार्याने गिधाड संवर्धनासाठी आवश्यक पावले उचलणे ही काळाची गरज आहे. यामुळे निसर्गाची समृद्धी राखली जाईल, आणि पर्यावरणीय प्रदूषणावर मात करण्यासही मदत होईल.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )