जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी दिलीप गावितची राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णभरारी !

अतिदुर्गम तोरणडोंगरीचा दिलीप गावित ठरला देशाचा सुवर्णवीर; ग्लास्गोमध्ये 100 मीटर टी-47 पॅरा अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक
दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार , दिनांक : 1 ऑगस्ट 2026

सुरगाणा | (प्रतिनिधी : रतन चौधरी) |
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम तोरणडोंगरी या आदिवासी गावातील सर्वसामान्य शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या दिलीप महादू गावित याने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर इतिहास घडविला आहे. स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे आयोजित राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पुरुष १०० मीटर टी-४७ पॅरा अॅथलेटिक्स प्रकारात सुवर्णपदक पटकावत दिलीपने भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने हे यश संपादन केल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
दिलीप गावित हा महादू गावित आणि मोहनाबाई गावित या मेहनती आदिवासी शेतमजूर दाम्पत्याचा मुलगा. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या दिलीपने सन २००९ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोरणडोंगरी येथे पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला. अभ्यासात तो सरासरी असला तरी लहानपणापासूनच त्याच्या अंगी चपळता, कष्ट करण्याची तयारी आणि नैसर्गिक क्रीडागुण दिसून येत होते. जंगलात गुरे चारणे, झाडांवर सहज चढणे, डोंगरदऱ्यांमधून धावणे अशा दैनंदिन जीवनाने त्याची शारीरिक क्षमता अधिक सक्षम होत गेली.शालेय जीवनात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चषक स्पर्धा, विविध कला-क्रीडा स्पर्धा तसेच सहशालेय उपक्रमांमध्ये दिलीप नेहमी उत्साहाने सहभागी होत असे. खो-खो, कबड्डी आणि धावणे या स्पर्धांमध्ये त्याने लहानपणापासूनच उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या अंगभूत क्रीडागुणांची ओळख शाळेतील शिक्षकांनी वेळीच करून घेतली आणि त्याला योग्य दिशा दिली.त्या काळातील मुख्याध्यापक भास्कर भुसारे तसेच शिक्षक केशव महाले, मधुकर राऊत, गणेश पाडवी, यशवंत भोये आणि लक्ष्मण पवार यांनी दिलीपच्या प्रतिभेला योग्य संधी उपलब्ध करून दिली. सन २००९ ते २०१६ या कालावधीत जिल्हा परिषद नाशिकतर्फे आयोजित अध्यक्ष चषक स्पर्धांमध्ये त्याला सातत्याने सहभागी करून घेतले. केंद्रस्तर, बीटस्तर, तालुकास्तर आणि जिल्हास्तरापर्यंत त्याने खो-खो, धावणे आणि कबड्डीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले.
विशेषतः शिक्षक मधुकर राऊत यांनी दररोज सकाळी दिलीपकडून धावण्याचा नियमित सराव करून घेत त्याच्यातील धावपटू घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. याच सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे धावण्याची आवड त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.दिलीपच्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे बालपणी झालेल्या एका अपघातात त्याचा उजवा हात गमावणे. परंतु या शारीरिक मर्यादेला त्याने कधीही कमजोरी मानले नाही. उलट या संकटावर मात करत त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर प्रत्येक स्पर्धेत स्वतःला सिद्ध केले. दिव्यांगत्वाला न जुमानता तो सतत धावत राहिला आणि प्रत्येक यशासोबत त्याचा आत्मविश्वास अधिकाधिक वाढत गेला.जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धांनी त्याच्या आयुष्याला निर्णायक दिशा दिली. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मिळणारे हे व्यासपीठ दिलीपसाठी मोठी संधी ठरली. याच स्पर्धांमधून त्याचा पाया मजबूत झाला, स्पर्धात्मक वृत्ती विकसित झाली आणि जागतिक स्तरावर यश मिळविण्याची प्रेरणा मिळाली.इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीपने क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. अखेर स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष १०० मीटर टी-४७ प्रकारात सुवर्णपदक जिंकून त्याने आपल्या आयुष्यातील सर्वोच्च यश संपादन केले.
दिलीपची आणखी एक जमेची बाजू म्हणजे यश मिळाल्यानंतरही तो आपल्या मातृशाळेला विसरला नाही. प्रत्येक वेळी गावात आल्यानंतर तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तोरणडोंगरी येथे आवर्जून भेट देतो. विद्यार्थ्यांशी संवाद साधतो, क्रीडा क्षेत्रातील अनुभव सांगतो आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देतो.सध्या शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर चौधरी तसेच शिक्षक पंडित गायवन, मनोहर भोये, रामदास भोये, पुंडलिक चौधरी, श्रीकांत गवळी, मधुकर राऊत आणि गणेश पाडवी हेही विद्यार्थ्यांना दिलीपच्या यशाचा आदर्श समोर ठेवून प्रोत्साहित करीत आहेत.दिलीप गावितच्या या ऐतिहासिक यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमकार पवार यांनी अभिनंदन केले आहे. तसेच तोरणडोंगरी ग्रामपंचायत, पेसा समिती, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि तालुक्यातील नागरिकांनीही आनंद व्यक्त केला आहे.याशिवाय गटविकास अधिकारी साहेबराव खेडकर, गटशिक्षणाधिकारी श्रीमती अल्पा देशमुख, विस्तार अधिकारी धनंजय कोळी, केंद्रप्रमुख धनराज भोये, तसेच शिक्षक पांडुरंग पवार, उत्तम वाघमारे, रतन चौधरी, सुधाकर भोये, कृष्णा देशमुख आणि आनंदा जाधव यांनी दिलीपचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमकार पवार म्हणाले,“जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या अध्यक्ष चषक स्पर्धांमधून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, संगीत, नृत्य, लेखन आणि चित्रकला अशा विविध गुणांना व्यासपीठ मिळते. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना दिशा मिळते. दिलीप गावितचे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक हे जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा जिवंत पुरावा आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत, हे दिलीपने आपल्या यशातून सिद्ध करून दाखविले आहे.”
दिलीप गावितची यशोगाथा ही केवळ एका खेळाडूची कथा नसून ग्रामीण आणि आदिवासी भागातील लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश आहे. साधी परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि शारीरिक मर्यादा यांवर मात करून जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जागतिक स्तरावर यश मिळविता येते, हे दिलीपने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. आज तोरणडोंगरीच्या मातीतील हा हिरा संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक ठरला असून, त्याच्या सुवर्णभरारीने जिल्हा परिषद शाळांमधून घडणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांची क्षमता पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित केली आहे.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार , दिनांक : 1 ऑगस्ट 2026
