सुरगाणात पावसाचा कहर; नद्यांना महापूर, पुलांवरून पाणी – अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला, प्रशासन अॅक्शन मोडवर

दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार दिनांक : 8 जुलै 2026
सुरगाणा | (प्रतिनिधी | रतन चौधरी ):-
नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यात गेल्या १७ ते १८ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पारंपरिक फरशी पूल आणि पाईप मोऱ्यांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा तालुक्याच्या मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असून आपत्ती व्यवस्थापनासाठी महसूल, पोलीस, वन विभाग आणि ग्रामपंचायती अॅक्शन मोडवर आहेत.तालुक्यातील नार, पार, गिरणा, अंबिका, तान, मान, कावेरी आणि वाझडी या प्रमुख नद्यांना महापूर आला असून अनेक ठिकाणी नदीपात्रांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदीवरील लहान पूल, फरशी पूल आणि मोऱ्यांवरून वेगाने पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक दुर्गम गावांचा तालुक्याशी तसेच शेजारील गावांशी संपर्क तुटल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

१५०.८ मिमी पाऊस; हंगामातील एकूण ४३५ मिमी नोंद
महसूल विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यात आतापर्यंत ४३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या अवघ्या १५ तासांत १५०.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरले असून डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वेग वाढल्याने नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुलांवरून पाणी; वाहतूक पूर्णपणे बंद
तालुक्यातील पिंपळसोंड, कुकूडणे, बोरचोंड, खोकरी, उंबरपाडा, पांगारणे, नटवरपाडा, आंबेपाडा, मनखेड तसेच इतर अनेक गावांकडे जाणाऱ्या फरशी पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. काही गावांचा १५ ते २० तासांहून अधिक काळ संपर्क तुटलेला असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.कवेली–मनखेड मार्गावर मोठे झाड उन्मळून पडल्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन झाड हटविल्यानंतर वाहतूक अंशतः सुरू करण्यात आली.
पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी
सुरगाणा तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. तातापाणी येथील गरम पाण्याचे झरे, साखळचोंड धबधबा, भिवतास धबधबा आणि हतगड किल्ला परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.उंबरठाण वनपरिक्षेत्र कार्यालयाने साखळचोंड धबधबा परिसरात प्रवेश बंद केला असून, भिवतास धबधबा येथे बाऱ्हे पोलीस ठाणे आणि वन समितीने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. हतगड किल्ल्यावर जाण्यास ग्रामपंचायतीनेही मज्जाव केला असून पर्यटकांनी कोणत्याही परिस्थितीत धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला दिला प्रतिसाद

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने किरकोळ घटना वगळता कोणतीही मोठी दुर्घटना किंवा जिवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
सततच्या पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजारपेठा ओस पडल्या असून सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनेक शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी झाली आहे.शेतीची सर्व कामे ठप्प झाली असून शेतकऱ्यांना शेतात जाणे अशक्य झाले आहे. अनेक भागांत दिवसभर वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल नेटवर्कमध्येही मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती
तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प राहिली. प्रशासनाच्या सूचनांनुसार शिक्षक शाळांमध्ये उपस्थित राहिले; मात्र नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे टाळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महसूल, पोलीस आणि वन विभाग सतर्क
तालुका प्रशासन, महसूल विभाग, पोलीस, वन विभाग, ग्रामपंचायती आणि आपत्ती व्यवस्थापन पथके संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संवेदनशील गावांमध्ये सातत्याने पाहणी सुरू असून पूरस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.महावितरण विभागालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने दुरुस्ती करण्यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा आणि आवश्यक साहित्याचा साठा उपलब्ध ठेवला आहे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. नदी, नाले, धबधबे, फरशी पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास करू नये, पूराच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने महसूल विभाग, पोलीस किंवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुलांच्या प्रश्नामुळे धोका वाढला
सुरगाणा तालुक्यातील अनेक नद्यांवर आजही जुन्या पद्धतीचे फरशी पूल आणि पाईप मोऱ्या असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत होते. यंदाही मुसळधार पावसामुळे या पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी उंच व कायमस्वरूपी पूल उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

एकूण परिस्थिती गंभीर; प्रशासन सज्ज
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यातील परिस्थिती गंभीर असली तरी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यटनस्थळांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवले आहे.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार दिनांक : 8 जुलै 2026
