





वणी येथे अवैध गुटख्याची वाहतूक पकडली, 43 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 18 ऑक्टोबर 2024
β⇔वणी(नाशिक), ता.18 (प्रतिनिधी : सुरेश सुराशे):- वणी परिसरात गुजरात राज्यातून महाराष्ट्रात होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक आणि वणी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने पांडाणे टोल नाक्याजवळ सापळा रचून अवैध गुटखा वाहतूक करणारे आयशर वाहन (MH15-JC-5522) पकडले. या वाहनातून गुटखा वाहतूक करणारे पाच संशयित होते, त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात यश आले, तर तीन आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहन तपासणी आणि मुद्देमाल : वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील अंकलेश्वर येथून महाराष्ट्रात अवैध गुटखा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायद्यासाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ”वणी-सापुतारा” राष्ट्रीय महामार्गावरील पांडाणे टोल नाक्याजवळ पथकाने सापळा रचला. संशयावरून आयशर ट्रकची तपासणी केली असता, शेतीसाठी वापरले जाणारे कॅरेट समोर दिसले, परंतु कॅरेटच्या मागे सफेद आणि हिरव्या प्लास्टिकच्या गोण्या आढळून आल्या. तपासणी केल्यावर त्यामध्ये 29 मोठ्या सफेद प्लास्टिकच्या गोण्या आढळल्या, ज्यामध्ये प्रत्येकी 15,600 हिरा पान मसाला पाकिटे होती, ज्याची किंमत 18 लाख 72 हजार रुपये होती. याशिवाय, 4 लाख 68 हजार रुपयांच्या रॉयल 717 तंबाखूच्या गोण्या आणि इतर सामान, एकूण 43 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक आणि फरारी आरोपी : या प्रकरणात शौकत चांद शेख (रा. न्यू टिळक रोड, वाडिया पार्क, अहिल्यानगर) आणि शेख जमीर जब्बार (रा. शेवगाव, नाईकवाडी मोहल्ला, अहिल्यानगर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, इतर तस्कर फरार झाले आहेत. फरारी आरोपींमध्ये गुजरातमधील सुरतमधील पुरवठादार व्यापारी ‘मर्दानी चाचा’ यांचाही समावेश आहे, ज्यांच्या विरोधात पोलीस शोधमोहीम राबवत आहेत. सदर कारवाई करणारे अधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, वणी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, निलेश सावकार, लक्ष्मण वायकंडे, पोलीस उपनिरीक्षक भिसे, विजय बिल भरणे, प्रमोद मंडलिक, स्वप्निल माळी, आणि मिलिंद पाटील यांनी संयुक्तपणे ही कारवाई राबवली. तपास पुढे सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510