दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार , दिनांक : 2 जुलै 2026

नाशिकमध्ये ४ व ५ जुलैला एम.बी.ए. लीग ब्रीज स्पर्धेचा थरार

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रीजपटू होणार सहभागी; १८ संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस

नाशिक | (प्रतिनिधी :आनंद खरे ):-

महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४ व ५ जुलै २०२६ रोजी नाशिक येथे प्रतिष्ठेच्या एम.बी.ए. लीग ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गोखले शिक्षण संस्थेच्या बी. वाय. के. महाविद्यालय परिसरातील गुरुदक्षिणा ऑडिटोरियम हॉल येथे होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील १८ बलाढ्य संघ सहभागी होणार असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू आपल्या कौशल्याचे दर्शन घडविणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष देवें दोषी आणि ज्येष्ठ ब्रीज संघटक विनोद कपूर यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर लगेचच स्पर्धांना प्रारंभ होईल.स्पर्धेत ‘टीम ऑफ फोर’ (स्विस लीग) आणि ‘मॅच पॉइंट पेअर्स’ असे दोन प्रकार खेळविण्यात येणार आहेत. स्विस लीगमध्ये १८ संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरतील. पहिल्या दिवसातील कामगिरीच्या आधारे अव्वल चार संघांची निवड होईल. हे चार संघ दुसऱ्या दिवशी सुपर लीगमध्ये अंतिम विजेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील.सुपर लीगमध्ये सकाळी १४ बोर्डांचे दोन राऊंड, तर दुपारच्या सत्रात १४ बोर्डांचा एक राऊंड खेळविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘मॅच पॉइंट पेअर्स’ प्रकारात जोडीच्या स्पर्धा होतील. या स्पर्धेत सकाळच्या सत्रात २४ बोर्ड, तर दुपारच्या सत्रात आणखी २४ बोर्ड खेळविले जातील.

यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू. अनिल पाध्ये, राजू तोलानी, कौस्तुभ बेंद्रे यांच्यासह अनेक नामांकित ब्रीजपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. नुकत्याच गोवा येथे झालेल्या आशियाई ब्रीज अजिंक्यपद स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या भारतीय संघात अनिल पाध्ये आणि राजू तोलानी यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.ब्रीज हा केवळ पत्त्यांचा खेळ नसून बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, स्मरणशक्ती, संयम आणि संघभावना यांची कसोटी पाहणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बौद्धिक खेळ आहे. अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळण्याबरोबरच महाराष्ट्रातील ब्रीज खेळाला अधिक चालना मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव हेमंत पांडे, मित्र विहार क्लबचे अध्यक्ष व ब्रीज खेळाचे संघटक विनोद कपूर, नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशनचे सचिव डॉ. अतुल दशपुते तसेच सूर्या रेड्डी विशेष परिश्रम घेत आहेत.


ठळक बाबी :

प्रमुख खेळाडू : अनिल पाध्ये, राजू तोलानी, कौस्तुभ बेंद्रे आदी

दिनांक : ४ व ५ जुलै २०२६

स्थळ : गुरुदक्षिणा ऑडिटोरियम, बी. वाय. के. महाविद्यालय परिसर, नाशिक

आयोजक : महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन व नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशन

सहभाग : १८ संघ

स्पर्धेचे प्रकार : टीम ऑफ फोर (स्विस लीग) व मॅच पॉइंट पेअर्स

उद्घाटन : ४ जुलै, सकाळी १०.०० वाजता

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार , दिनांक : 2 जुलै 2026