





रागिणी कामतीकर यांच्या सुश्राव्य गायनातून महर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांना स्वरांजली

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 25 सप्टेंबर 2024
β⇔नाशिक(शहर ),दि,25 (प्रतिनिधी : छाया लोखंडे ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के.बी.के.ए.के. महिला महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे महर्षी सर डॉ. मो. स. गोसावी संगीत महोत्सवाचे आयोजन आज रागिणी कामतीकर यांच्या सूश्राव्य सुरावटींनी संस्थेच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव आणि खजिनदार, प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. आविराज तायडे यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला आणि संगीत विभागाच्या कार्याची माहिती देऊन महर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या कार्याची आठवण करून दिली. त्यांनी संगीत महोत्सवाच्या पार्श्वभूमीबद्दल विवेचन केले तसेच प्रमुख गायिका रागिणी कामतीकर यांचा परिचय करून दिला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात संगीत विभागाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर संस्थेच्या सचिव प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, प्रकल्प संचालक डॉ. प्रदीप देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. पी. देशपांडे, चेअरमन डॉ. सुहासिनी संत, आणि संगीत विभाग प्रमुख डॉ. आविराज तायडे उपस्थित होते.

विशेष देणगी:
कार्यक्रमाच्या वेळी गो. ए. सोसायटीचे माजी विद्यार्थी विवेक गोगटे यांनी एक लाख रुपयांची देणगी संस्थेला दिली.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी महर्षी सर डॉ. गोसावी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण करून देताना त्या म्हणाल्या की, त्यांच्या कार्याच्या बळावर समाजाची प्रगती होणार आहे. महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या स्व. डॉ. सुनंदाताई गोसावी यांनी ललित कला व संगीताला प्रोत्साहन दिले होते, असेही त्यांनी सांगितले. संगीत विभागातील यशस्वी विद्यार्थिनींचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
संगीत मैफिलीत रागिणी कामतीकर यांचे गायन:
रागिणी कामतीकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या ओवीने केली. त्यांनी “मोगरा फुलला,” “ऐरणीच्या देवा,” आणि कवी ग्रेस यांच्या “संध्याकाळच्या कविता” या मराठी गीतांसह “भय इथले संपत नाही,” “निज निज माझ्या नंदलाला” हे अंगाई गीत, “वेडात मराठे वीर दौडले सात” अशी अनेक मराठी गाणी सादर केली. हिंदी गीतांमध्ये त्यांनी “आएगा आनेवाला,” “मोरा गोरा अंग लई ले,” “मोहे शाम रंग दे,” “हमने देखी है इन आँखों की महकती खुशबू,” “पिया तोसे नैना लागे रे,” “ना जिया लागे न” अशी अनेक लोकप्रिय गाणी सादर केली. कार्यक्रमात रागिणी कामतीकर यांना साथ संगत आदित्य कुलकर्णी, अमित तांबे, पार्थ शर्मा, आणि अल्पेश माळवे यांनी केली. सूत्रसंचालन स्मिता मालपूरे यांनी आपल्या मधुर आवाजात केले. रागिणी कामतीकर यांच्या सुरेल गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले आणि कार्यक्रम चिरस्मरणीय ठरला.
या प्रसंगी गोसावी आणि देशपांडे कुटुंबातील सर्व सदस्य, संस्थेचे पदाधिकारी, देणगीदार, नाशिकमधील रसिक श्रोते, विविध महाविद्यालयांतील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सौ. आश्लेषा कुलकर्णी यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. नितीन सोनगिरकर यांनी मानले.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )