





रतन टाटा यांचे निधन: महाराष्ट्रात एक दिवसाचा शासकीय दुखवटा, भारतरत्नसाठी प्रस्ताव

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि 10 ऑक्टोबर 2024
β⇔ मुंबई : ता.10 ( प्रतिनिधी : सुरेश सुराशे ):- टाटा उद्योग समूहाचे ज्येष्ठ आणि जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी, ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारताच्या उद्योग क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्त्व हरपले आहे. राज्यात आज, गुरुवारी, शासकीय दुखवटा पाळण्यात येणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.
रतन टाटा यांना श्रद्धांजली म्हणून आणि अखेरचा निरोप देण्यासाठी हा शासकीय दुखवटा पाळला जात आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची विनंती केंद्र सरकारला करणारा प्रस्ताव मांडला, जो सर्वानुमते संमत झाला.
शोक प्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हे समाज उभारणीचे एक प्रभावी साधन आहे. देशाची प्रगती नवनवीन उद्योगांच्या उभारणीमुळेच शक्य होते. परंतु, त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि समाजाबद्दल प्रामाणिक कळकळ हवी असते. रतन टाटा यांच्या रूपाने आपण अशाच विचारांचे एक समाजसेवी, देशप्रेमी मार्गदर्शक गमावले.
रतन टाटा यांचे महान योगदान
रतन टाटा यांचे भारताच्या उद्योग क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे. त्यांनी आपल्या नैतिक मूल्यांवर कायम ठाम राहून आंतरराष्ट्रीय स्तरावर टाटा समूहाची प्रतिमा उंचावली. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पंत असलेले रतन टाटा यांनी या समूहाचा अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे कारभार पाहिला आणि समूहाला अभूतपूर्व उंचीवर नेले.
रतन टाटा यांनी केवळ उद्योगच नव्हे, तर समाजसेवा, शिक्षण, आणि आरोग्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा आणि कोविड काळात त्यांनी पीएम रिलीफ फंडाला दिलेली 1500 कोटी रुपयांची मदत यांसारख्या त्यांच्या कृतींचे उदाहरण कायम स्मरणात राहील.
नवनिर्मिती आणि दानशूरतेचा अपूर्व संगम रतन टाटा यांच्यात होता. त्यांनी टाटा समूहाच्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. तरुणांमध्ये कर्तृत्वाला आणि प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ते कायम आघाडीवर होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात त्यांनी तरुणांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी इनोव्हेशन सेंटर सुरू केले.
महाराष्ट्रासाठी अभिमानाचे प्रतीक
महाराष्ट्राच्या सरकारने रतन टाटा यांना ‘उद्योग रत्न’ पुरस्कार प्रदान केला होता, ज्यामुळे राज्यासाठी ते अभिमानाचे प्रतीक होते. त्यांच्या निर्णयांनी राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीला गती दिली होती. त्यांच्या निधनाने देशाची आणि महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
रतन टाटा यांच्या महान कार्याचे स्मरण करत राज्य मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिक त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी, अशी प्रार्थना करतात.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )