”एकच मिशन ! जुनी पेन्शन !! नवीन पेन्शन योजना फसवी ”- प्रा डॉ सोमनाथ वाघमारे- राज्य समन्वयक
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि 12 डिसेंबर 2023
β⇔ नागपूर , ता 12 (प्रतिनिधी :डॉ. भागवत महाले ) :- आज दिनांक मंगळवार १२ डिसेंबर २00३ रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन जनक्रांती महामोर्चा मध्ये महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी या महामोर्चामध्ये जुनी पेन्शन लागू करावी या एकमेव मागणीसाठी सहभागी झाले होते, या वेळी महाराष्ट्रातील वरिष्ठ महावि्यालयीन प्राध्यापक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जो पक्ष कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करेल, त्याच पक्षाला हे कर्मचारी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत मतदान करतील अशी भूमिका उपस्थित सर्व आंदोलकांनी घेतली. २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. सदरील योजना ही अन्यायकारक असून ही योजना शेअर बाजाराशी निगडित असल्याने या योजनेतून निवृत्ती पश्चात कोणतीच निश्चित हमी कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या योजने बाबत प्रचंड नाराजी आहे.
मागील काही वर्षापासून जुनी पेन्शन हा विषय संपूर्ण देशात गाजत असून आतापर्यंत राजस्थान, पंजाब, छत्तीसगढ, झारखंड आणि नुकतीच हिमाचल प्रदेशात नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना परत सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कर्मचारी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी हे कर्मचारी विविध मार्गाने मोर्चे, आंदोलने, काम बंद आंदोलनातून सरकारवर दबाव वाढवत आहेत. मागील काही आंदोलनातून मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जुनी पेन्शन योजना व सेवा उपदान या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. आता सर्व कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती वेतन मिळावे, या मागणीसाठी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
मार्च २०२२ मध्ये मध्यवर्ती कर्मचारी संघटना व इतर सर्व कर्मचारी संघटना बेमुदत संपावर गेल्यानंतर शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अभ्यास गट स्थापन केला होता.सदर अभ्यास गटाने त्यांचा अहवाल शासनाला नुकताच सुपूर्त केला आहे. या अहवालात काय बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांत उस्तुकता आहे.
एका बाजूला सरकार अभ्यासगट स्थापन करून विविध प्रकारची आश्वासने व मध्यम मार्ग काढण्याचा विचार करत असताना कर्मचारी मात्र कुठल्याही तडजोडी न स्वीकारता जुनीच पेन्शन मिळावी, या मागणीवर ठाम आहेत.
१२ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या पेन्शन जनक्रांती महामोर्चामध्ये सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्ष नेते यांनी उपस्थित राहून आगामी काळात हे कर्मचारी आपल्याच बाजूने राहतील, या साठी आश्वासनाची जंत्रीच सादर केली..
पेन्शन जनक्रांती महामोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समितीच्या वतीने सक्रिय सहभाग घेतला होता. या वेळीं कृती समितीचे राज्य अध्यक्ष प्रा. डॉ मारोती तेगंमपुरे, राज्य सचिव- प्रा डॉ अमोल लाटे, राज्य समन्वयक प्रा डॉ सोमनाथ वाघमारे , राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा डॉ ललित कुमार शनवारे, प्रा. रमेश बहादुरे, प्रा डॉ चारुदत्त बेले, प्रा अरविंद पाटील, प्रा डॉ अतुल चौरपगार, प्रा डॉ मनोज गिरम, प्रा डॉ शिवाजी भोसले, प्रा डॉ पुरुषोत्तम चाटे, प्रा डॉ आत्माराम आंधळे, प्रा डॉ विठ्ठल बोरकर, प्रा डॉ नितीन रोडे, उपाध्यक्ष त्र्यंबकेश्वर महाविद्यालय – प्रा डॉ. भागवत महाले , प्रा संदीप गोसावी ,प्रा. प्रशांत रनसुरे,प्रा .डॉ दिनेश उकिर्डे इ. महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
प्रा डॉ सोमनाथ वाघमारे
राज्य समन्वयक
महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती
दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक डॉ. भागवत महाले : मो .८२०८१८०५१०