





“रंग स्पर्श” चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 01 ऑक्टोबर 2024
β⇔नाशिक(शहर),दि,01(प्रतिनिधी : प्रा. छाया लोखंडे):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयातील चित्रकला विभागाच्या विद्यार्थिनींनी साकारलेल्या “रंग स्पर्श” या विविधरंगी चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक्ट संजय पाटील यांच्या हस्ते सुनंदाताई गोसावी कलादालनात पार पडले. या प्रदर्शनात म्युरल, लँडस्केप, रचनाचित्र अशा विविध कलामाध्यमांमध्ये साकारलेल्या कलाकृतींचा समावेश असून, नाशिककरांना पुढील तीन दिवस या कलात्मक आनंदाचा अनुभव घेता येणार आहे.
याप्रसंगी उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष आर.पी. देशपांडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर, झोनल सेक्रेटरी प्राचार्य राम कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आर्किटेक्ट संजय पाटील यांनी विद्यार्थिनींच्या कलाकृतींचे कौतुक करताना, त्यांच्या मेहनतीतून तयार झालेल्या कलाकृतींना व्यावसायिक क्षेत्रात उत्तम संधी मिळेल असे मत व्यक्त केले. तसेच, इक्षाण अकॅडमीचे संस्थापक कुणाल राठोड यांनी त्यांच्या अकॅडमीतील फोटोग्राफी, 3D ॲनिमेशन, ग्राफिक डिझायनिंग, सिनेमॅटोग्राफी यांसारख्या कोर्सेसची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष आर.पी. देशपांडे यांनी आपल्या भाषणात “कला समाजाभिमुख असावी” असा संदेश दिला.
या सोहळ्यात चित्रकार ऋषिकेश भंडारे यांनी व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक सादर केले. सोमवार, ३० सप्टेंबर रोजी संध्या केळकर यांनी शोधनिबंध लेखनावर मार्गदर्शनपर व्याख्यान घेतले. १ ऑक्टोबर रोजी ऋतिका ओसवाल यांचे “आर्ट थेरेपी” या विषयावर व्याख्यान होणार आहे. हे चित्रकला प्रदर्शन सर्वांसाठी सकाळी ११ ते रात्री ७ वाजेपर्यंत १ ऑक्टोबरपर्यंत खुले असणार आहे. प्राचार्य डॉ. संध्या खेडेकर यांनी जास्तीत जास्त रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन केले आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )