





सायली खैरनारची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड : कोटबेल गावाचा अभिमान

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 14 ऑक्टोबर 2024
β⇔सटाणा : ता.14 ( प्रतिनिधी : वसंत सोनवणे ):- जिल्हा परिषद आदर्श शाळा, कोटबेलची विद्यार्थिनी सायली सतीश खैरनार हिने नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या फ्रीस्टाइल कुस्ती खेळ प्रकारात 30 किलोग्रॅम वजनी गटात विभागीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिला परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवडण्यात आले आहे, आणि सायलीने आपल्या कर्तृत्वाने मुलींना एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. तिच्या या यशामुळे विविध स्तरातून तिला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोटबेल गाव हे कुस्तीचा वारसा लाभलेले आहे. त्यामुळे या शाळेत कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लाल मातीचा आखाडा’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. गावातील कुस्ती तज्ञ सतीश खैरनार आणि प्रवीण खैरनार यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेतील विद्यार्थी मैदानी खेळांकडे वळत आहेत आणि त्यात विशेष कामगिरी करत आहेत.चालू शैक्षणिक वर्षात शाळेच्या तेजल खैरनार, नव्या भामरे, रोशन जाधव, कृष्णा खैरनार, जयदीप खैरनार या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत समाजाचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच, हिरकणी खैरनारने 33 किलो वजनी गटात जिल्हास्तरावर उपविजेतेपद पटकावले आहे.
13 ऑक्टोबर रोजी भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत झालेल्या स्पर्धेत सायली खैरनारने आपले कौशल्य सिद्ध करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी यशस्वी प्रवेश मिळवला आहे. तिच्या या यशात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पलता पाटील यांच्यासह शिक्षक वसंत सोनवणे, विलास देवरे, प्रवीण चव्हाण, प्रशांत देवरे, मनोहर गांगुर्डे आणि इतर शिक्षकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सायली खैरनारच्या या कामगिरीमुळे कोटबेल गावाचा अभिमान वाढला असून तिचे विशेष अभिनंदन होत आहे.

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )