Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

β⇒ : नाशिक : मणिपूर अराजकता – “अविश्वासार्ह , अविचारी , विखारी रानटी पशूंमध्ये परावर्तित होतोय, आपला समाज…सावध व्हा , मायबहिणींनो” ! – डॉ.प्रतिभा जाधव

'मणिपूरच्या क्रूर घटने' 'माणूस' तरी कसे म्हणावे त्यांना?  हेच का  विश्वगुरू भारताचे रूप 

0 0 2 3 9 9

‘मणिपूरच्या क्रूर घटने’ ‘माणूस’ तरी कसे म्हणावे त्यांना ?  हेच का  विश्वगुरू भारताचे रूप   
 

  अराजकता, अविश्वासार्ह , अविचारी , विखारी रानटी पशूंमध्ये परावर्तित होतोय, आपला समाज…सावध व्हा , मायबहिणींनो ! डॉ. प्रतिभा जाधव

β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक  प्रतिनिधी : डॉ भागवत महाले 
—————————————-
β⇒  नाशिक , ता .२३  ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :  तीन दिवसांपूर्वी समाजमाध्यमात पसरलेला मणिपूरचा ‘तो’ व्हिडियो समाजमाध्यमात बघितला आणि सुन्न होऊन जागेवरच मटकन बसले, काहीच सुचेना…! एवढे अमानवीय, विकृत कसे वागू शकतात माणसं? बरं ‘माणूस’ तरी कसे म्हणावे त्यांना? हिंस्त्रं श्वापदासारखी दिसत, भासत, वागत होती ती झुंड त्या विशीतल्या मुलीबरोबर. कोणत्या काळात जगतोय आपण नक्की? मोठ्ठं प्रश्नचिन्ह!! एकवीस वर्षाच्या त्या तरुण मुलीला विवस्त्र करून तिच्या अवयव, गुप्तांगाशी भयंकर पद्धतीने चाललेली छेडछाड, ती हजार पुरुषांची बेभान उन्मादित झुंड आणि त्या विकृत झुंडीत जिवाच्या आकांताने रडणारी-याचना करणारी भेदरलेली ‘ती’ असहाय एकटी. पुढे एका घोळक्यात पुन्हा एक स्त्री तशाच अगतिक अवस्थेत विवस्त्र तो घोळका दोघींची नग्न धिंड काढत त्यांच्या शरीराचे वाट्टेल तसे लचके तोडत चाललाय. जराशीही संवेदनशीलता वा माणूसपण शिल्लक असणाऱ्या सुसंस्कृत व्यक्तीस ते दृश्य बघून भयंकर संताप होतो, टचकन डोळे भरून येतात आणि ते अमानवी दृश्य बघताना मानसिक धक्का बसतो, घसा कोरडा पडतो, डोक्यात सणक जाते. हाच का तो ‘अमृतकाल’? हेच ते ‘अच्छे दिन’ हेच का ते ‘विश्वगुरूपद’? असं असेल तर आम्हाला यातलं काहीच नको किमान २०१४ पूर्वी जसा भारत होता तसाही चालेल पण गायीपाई माणसं कापणारा-जाळणारा आणि बाईला नागवं करून तिला लुटणारा ‘दांभिक विश्वगुरु’ भारत नकोच आहे आम्हाला असे विचार कोणत्याही विचारी माणसाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.
                             डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते “I have no homeland!” तसंच आम्हा स्त्रियांना वाटू लागलं आहे अलीकडे प्रकर्षाने! तो मणिपूरचा व्हिडियो बघून राग, संताप, हतबलता,निषेध, भीती आक्रोश सारं सारं एकदम दाटून आलं. ४ मे २०२३ चा व्हिडियो तब्बल ७७ दिवसांनी समाजमाध्यमात आला. ४ मे २०२३ पासून मणिपुरमधील इंटरनेट सेवा शासनाने बंद केली आहे. माध्यमात मणिपूरची एकही बातमी ह्या अडीच महिन्यात आली नाही. ज्या सत्ताधारी आय.टी. सेलमुळे सध्याची देशाची वाईट अवस्था झालीय त्याच माध्यमाचा वापर करून दिल्लीतील एका जुन्या घटनेचे फोटो आय.टी. सेलने पसरवले व ‘मैतई समूहाच्या मुलीवर कुकी समूहाने अत्याचार करून हत्या केल्याची अफवा पसरवली. मग काय नेहमीप्रमाणे कुठलीही खातरजमा न करता तिथे मैतई बहुसंख्यांकांचा अमानवी हैदोस सुरु झाला. केंद्र सरकारला जे अपेक्षित होते तेच घडविण्यात आले होते. संधीची वाट पाहणारे मैतई मोकाट सुटले आणि केंद्राने अडीच महिने मौन व्रत धारण केले. तिथले नागरिक, दिल्लीतील कुकी संघटना, विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, समाज माध्यमातून विवेकी नागरिक सतत प्रधानमंत्री व केंद्राकडे विनंत्या, संविधानिक मोर्चे स्वरुपात विनवणी करत असताना प्रधानमंत्र्यांनी त्याबाबत तोंडातून ‘ब्र’ देखील काढला नाही. मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातील अत्याचारित जी पीडिता आहे तिचा पती कारगिल युद्धात लढलेला माजी सैनिक आसाम रेजिमेंटमधील सुभेदार होता. हा सारा अन्याय सहन करताना तो म्हणाला की “मी प्रामाणिकपणे माझे कर्तव्य बजावत असताना देशाचे रक्षण केले पण आपले घर, गावकरी, पत्नीच्या अब्रूचे रक्षण करू शकलो नाही.” किती कळवळत असेल त्याचा जीव?
आता हे सारे का? व कसे घडते आहे? याबद्दल सामान्य माणसाला प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही तर त्याचे असे आहे की, मणिपूरच्या एकूण लोकसंख्येत ५३ टक्के असलेल्या मैतेई समाजाला अनुसूचित जमातीतून (एस.टी.) आरक्षण देण्याच्या हालचाली हे त्याचे तात्कालीक कारण असले तरी त्यामुळे नागा आणि कुकी या आदिवासी समाजात असलेला असंतोष आणि त्याकडे राज्य सरकारने केलेले दुर्लक्ष हे त्याचे मुख्य कारण आहे. नागा आणि कुकी यांचे मणिपूरच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाण ४० टक्के आहे व ते प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात राहतात. त्याचे वास्तव्य असलेल्या जंगलाचे रूपांतर आरक्षित वनांमध्ये करण्याची मोहीम सुरू झाल्याने आदिवासींवर निर्वासित होण्याची वेळ आल्यामुळे त्यांच्यात असंतोष होता. येथील मैतई हिंदू वैष्णव समाज शहरी श्रीमंत वर्गात मोडतो तर नागा व कुकी समाज ख्रिस्ती बहुल आहे जो डोंगराळ पहाडी भागात राहतो व अजूनही प्रगतीपासून बरेच दूर आहे. मणिपूरमधील एकूण ५२ लोकप्रतिनिधींमध्ये ५० लोकप्रतिनिधी मैतई तर केवळ १२ लोकप्रतिनिधी कुकी व नागा समूहातील असतात. तेथील शिक्षणसंस्था, कारखाने, उद्योगधंदे हे बहुसंख्य मैतई लोकांचे आहेत. मैतई पहाडी जमीन खरेदी करू शकत नाही परंतु कुकी-नागा शहरी जमिनी खरेदी करू शकतात हा कायदा तिथे आहे. कुकी व नागा आपापल्या डोंगराळ भागात आपले जीवन व्यतीत करत जल, जंगल, जमीन यांना जीवापाड प्रेम करणारे आहेत. मैतेई समाजाला अनुसूचित जमातीतून (एस.टी.) आरक्षण देण्याच्या हालचाली शासनाने सुरु केल्या व कुकीना आपल्या अस्तित्वावरच घाला घातल्यासारखे वाटले. आधीच परिघाबाहेर फेकले गेलेल्या ह्या समूहाच्या जमिनी विकत घेण्याचे अधिकार मैतईना सदर आरक्षणामुळे मिळणार आहेत. ह्या प्रकरणास दुसरी राजकीय बाजू म्हणजे आदिवासींची कत्तल आणि त्यांना जंगलातून पहाडी क्षेत्रातून बेदखल करणे, निर्वासित करणे. ‘जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया’ने केलेल्या सर्व्हेनुसार मणिपूरमध्ये अनेक उंची मूलद्रव्ये आहेत उदा. लाइमस्टोन, क्रोमाइट, निकेल, कॉपर ,मॅग्नेटाइट, मॅलाकाइट, अझुराइट, मॅग्नेटाइट आणि विविध प्लॅटिनम गटातील घटक येथे मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत.
                ही सर्व खनिजे-मूलद्रव्ये ज्या जंगल, पहाडात आहेत तिथे कुकी व इतर अल्पसंख्य आदिवासींची हजारो वर्षांपासून वस्ती आहे. मणिपूर हा ८९% पहाडी प्रदेश आहे. एवढी दुभती गाय असल्याने सत्ताधाऱ्यांच्या भांडवलदार-कारखानदार मित्रांना यात रस आहे अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. मित्रांच्या कंपन्यांना इथे खाणकाम मिळाले म्हणजे आगामी निवडणूकांना लागणाऱ्या प्रचंड पैशांची आपसूक सोय होणार असे एकंदर यामागे गणित आहे. इथल्या सर्वसामान्य नागरिकांशी त्यांच्या गरजा, अडचणी यात धर्मांध सत्तापिपासू सत्ताधीशास काडीचाही रस नसतो. असेही ते कुणाचीच पर्वा करत नाही हे गेल्या नऊ वर्षात आपण बघतोच आहोत. इथल्या खनिज संपत्तीचा लाभ उद्योगपती मित्रांना द्यायचा तर त्यासाठी आदिवासींचा रक्तपात करणे आणि त्यांच्यात दहशत निर्माण करून जंगलाचा ताबा मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठीच मैतेई समाजाला अनुसूचित जमातीतून (एस.टी.) आरक्षण ही टूम काढण्यात आली आहे. त्यात ठिणगी टाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा आय.टी.सेल. अव्याहत झटत असतोच की!
ह्या कारणामुळे मैतई व कुकी यांच्यात संघर्ष सुरु झाला, वाढत गेला पण प्रधानमंत्र्यांनी एकदाही याबाबत कुठेही उल्लेख केला नाही की शांततेचे आवाहन केले नाही. विशेष तर याचे वाटते की, युक्रेन आणि रशियाचे युद्ध फक्त एका फोनवर २ तास थांबवल्याची वल्गना करणारे प्रधानमंत्री ८० दिवस उलटूनही इथे शांततेचे आवाहन का बरे करत नसतील? त्यांच्यासाठी मणिपूर हा काही खुप किचकट विषय नसावा. मग ही उदासीनता-मौन का? स्वतःचा मेंदू स्वतःच्याच ताब्यात असणाऱ्या कुणाही सामान्य नागरिकास पडावा असा प्रश्न मलाही पडला आहे.
                          ह्या ८० दिवसांदरम्यान मणीपुरात अराजक पसरले, पोलीस यंत्रणेकडून मैतईनी शस्त्रे लुटली, यात एके रायफली, एस,एल.आर, इन्सास, रायफल 303, ग्रेनेड्स आहेत. पोलिसांनी आवाहन करून फक्त १८ टक्के शस्त्रे परत केली आहेत. आता ही शस्त्रे लुटली? की पूरविण्यात आली? हे सुज्ञास सांगणे न लगे! ह्या घडीला तर तिथे जंगलराज पसरले आहे, कायद्याची भीती नाही आणि अप्रत्यक्षरीत्या पोलिसांचीही साथ म्हणून ५३ टक्के लोकसंख्या असलेले मैतई कुकिंवर बेछूट हल्ले करू लागले आहेत. इंटरनेट सेवा का बंद करण्यात आली? यामागील खरे रहस्य आता उलगडते आहे. अल्पसंख्यांक नेहमीच अशा संघर्षात वाईट पद्धतीने मारले जातात पण मात्र त्याहीपेक्षा अत्यंत वाईट पद्धतीने त्यांच्या महिलांचे बळी घेतले जातात. त्यांच्या शरीराची विटंबना, सामूहिक बलात्कार, नग्न धिंड आणि बरेच काही केले जाते; ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही.
                        ४ मे २०२३ रोजीचा जो व्हिडियो समाजमाध्यमात आला तो ही असाच अकल्पित-अनपेक्षित पण दुर्दैवाने तो इथल्या जातीय पुरुषप्रधान संस्कृतीचा विद्रुप-विकृत चेहरा ठसठशीतपणे दाखवतो आहे. त्यातून मणिपूर येथील दाहक, रानटी, वर्चस्ववादी विचार, कृत्य, भयावह परिस्थिती समजतेय. तिथे ४ मे नंतर आणि किती काही घडले असेल? कल्पना केली तरी थरकाप होतो. केंद्राला तिथली परिस्थिती याहून अधिक चिघळायला हवी आहे म्हणून हेतूत: हे दुर्लक्ष तथा डोळेझाक असावी. इथली शांतता, सहिष्णुता, स्त्रीसन्मान, भाईचारा वेगाने संपुष्टात येतोय आणि हे कुणासाठीच कधीच सुखावह असू शकत नाही. त्या महिलांची विटंबना करणारेही एका स्त्रीच्याच जनन इंद्रियातून आलेत ह्या जगात पण त्यांचं हे उन्मादी बेभान होणं माणसातलं माणूसपण संपल्याची नांदी देतंय. भान सुटलेल्या भयप्रद, अविश्वासार्ह , अविचारी , विखारी रानटी पशूंमध्ये परावर्तित होतोय आपला समाज…सावध व्हा मायबहिणींनो!
सत्तेसाठी रक्तपात आणि अत्याचार सुरूच राहणार आहेत फक्त त्याच्या बातम्या तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचू न देण्याची काळजी घेतली जाईल. प्रवासात वा गर्दीत आजही कुणा परपुरुषाचा नकोसा स्पर्श झाला तर घाण वाटते, किळस येते, तो स्पर्श जाणवत राहतो किती तरी वेळ पण इथे तर थेट योनीला हात घालणारा तो स्पर्श त्या मुलीला अंतरबाह्य उध्वस्त करून गेला असणार आहे. त्या हैवानांनी, नग्न धिंड आणि बलात्कारानंतर ती विशीतली निरपराध मुलगी संपवून टाकली. ती जिवंत राहिली असती तर ते उध्वस्त करणारे स्पर्श, बोचकारे, अवयवांची ओढाताण, त्यानंतर झालेले कैक सामुहिक बलात्कार आयुष्यभर क्षण-क्षण तिला भीषण दु:ख देत मारत राहिले असते. आपण कोणत्या जात,पक्ष, धर्म ,लिंग, प्रदेशाचे नसून आपण भारतीय आहोत व आपल्या भारतीय मायबहिणीवर झालेला हा घृणास्पद विकृत अत्याचार निंदनीय आहे याचा साधा निषेधही अनेक अंधभक्त करू धजत नाही. चुकीच्या नेत्यामागे बुद्धी गहाण ठेवली की , अन्यायाचेही समर्थन करण्याची दयनीय स्थिती येऊन ठेपते त्यामुळे कुविचारांमागे फरफटत जाऊन काहीच उपयोग नसतो.
६० हजारांपेक्षा अधिक लोक विस्थापित आहेत. आर्मी निर्वासित छावण्यांमध्ये कोणत्याही किमान सुविधा नाहीत. प्यायचे पाणी नाही, केवळ थोडासा भात मिळतोय खायला, ह्या छावण्यांमध्ये प्रसूत झालेल्या स्त्रीला व अर्भकास आरोग्य सुविधा नाहीत, ८० दिवसांपासून तिथल्या शाळा बंद आहेत. आजच्या घडीची मणिपूरची अवस्था अशी आहे. १४२ माणसे मारण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधींची घरे जाळण्यात आली आहेत. २०० घरे व कित्येक चर्च जाळण्यात आले आहेत. पावसाला असल्याने डासांचे प्रमाण व त्यातून झालेले विविध आजार. कित्येक लहान मुलं उपचारांशिवाय मायबापांच्या डोळ्यासमोर मयत झाले आहेत.
                       इथे सर्वसामान्य नागरिक म्हणून नेहमीप्रमाणे निष्पक्ष मानवतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतून ह्या घटनेकडे मी बघते आहे. आपली झापडं, लेबलं, पक्ष, विचारधारा, झेंडे बाजूला ठेवून भवताल बघितला म्हणजे म्हणजे अन्याय-अत्याचार दिसतील. टिकली लावलेल्या प्रत्येक ‘भारतमातेचे’ रक्षण होतेय का? मणिपूरमध्ये रेल्वेसेवा नसल्याने राष्ट्रीय महामार्गाद्वारेच सर्व जीवनावश्यक वस्तू नागरीकांपर्यंत पोहचतात पण गेली ५४ दिवस इथले सर्व मुख्य रस्ते झुंडीने बंद करण्यात अआले आहेत. अयशस्वी मुख्यमंत्री बिरेन सिंह हे सारे उघड्या डोळ्यांनी बघत आहेत खुर्चीचा मोह त्यांना सुटत नाहीये. अखेर त्यांना काय साध्य करायचे आहे? काही कळतेय का?
“पक्ष येतात जातात, निवडणुका येतात जातात, सत्ता येते जाते पण लोकतंत्र जिवंत राहायला पाहिजे.” असे अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते. सामाजिक शांतता आणि सौख्य निर्माण करू शकत नसेल तर अशा पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही पण इथे कुणाला पडलेय नैतिकतेचे? देशाला जगातील ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळून देणाऱ्या महिला खेळाडूंची पर्वा इथल्या सत्तेला नाही, त्यांना देशद्रोह्यांसारखी वागणूक देणाऱ्या शासनाच्या गणतीत दूरदूरपर्यंत मणिपूरच्या आदिवासी कुकी महिलांच्या वेदना असतील? याच जागी जर विटंबना करणारे मुस्लिम असते तर देशातला सत्तर टक्के समाज खवळून उठला असता. पण आता ह्या अन्यायकारी प्रकरणावर बोलणारे आहेत ते मानवतावादी, विवेकवादी कार्यकर्ते आहेत, प्रगतिशील लेखक, विचारवंत आहेत. पाऊस,पान फुलं, व्रतं , पूजा वगैरेवर लिहिणारे बोलणारे मूग गिळून बसलेत. केरळातल्या गरोदर हत्तीण गेली तीही घटना वाईटच होती, त्यावर पान पानभर फेसबुक-व्हाट्सप ग्रुपवर लिहीणाऱ्या ‘साजूक तुपवाल्या अर्धवट मैत्रिणी’ आता कुठे गायब झाल्यात कुणास ठाऊक? एवढं शांत स्वस्थ कसं बसू शकतात बरं हे लोक? यांचा जन्म कुठून झालाय? किती फसवणूक स्वतःची, केवढी मोठी प्रतारणा माणुसपणाशी! साधा निषेधही व्यक्त करण्याची सद्बुद्धी तुमचा धर्म कर्म देव तुम्हाला देत नाही? तूमच्या घरातल्या आया-बहिणी- लेकी अशा घटनेवेळी तुम्हाला आठवू नयेत? तो व्हिडियो पाहून कित्येकदा ढसाढसा रडले असेल मी दार बंद करून. ज्या मैत्रिणींनी बघितला त्या रात्रभर झोपू शकलेल्या नाहीत. कुठे चाललोय आपण? प्रगत काळातून मध्ययुगात की आदीकाळात? जिथे बाई फक्त भोगदासी आहे, बाई हणजे मादी आहे. बाई म्हणजे शरीर आहे . पण बाई म्हणजे ‘व्यक्ती’ नाही ‘मानव’ नाही. एका जातीने दुसऱ्या जातीला अपमानित , नामोहरम करण्यासाठी एकमेकांच्या स्त्रियांवर बलात्कार करून मर्दुमकी गाजवायची पुरुषार्थ गाजवायचा . दाखवायचा वाह रे! पुरुषार्थ !! खरी मर्दुमकी दाखवायची असेल तर पुरुषांनी आपापसात यावे समोरासमोर. एकमेकांवर सूद उगारण्यासाठी स्त्रियांचे वस्तुकरण कशासाठी करताय? जातीय वा धार्मिक भांडणात स्त्रियांना शिकार वा बळी का केले जाते? कुठेही युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली की निरपराध लहान मुले व महिला यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात आणि इतिहास याला साक्षी आहे, आज तर हे शासन पुरस्कृत लांडगे दिवसाढवळ्या, कायद्याचे ना कुठलेच भय न बाळगता हत्या करत आहेत, बलात्कार करत आहेत.
त्या २१ वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असताना तिचे वडील व भाऊ त्या झुंडीचा प्रतिकार करू लागले तेव्हा त्या दोघांनाही ठार मारण्यात आले. झुंडीला बुद्धी नसते ना विचार! अशी झुंड राक्षस होते. तेच चित्र मणिपूर मध्ये दिसतेय. त्या गर्दीतल्या सर्व विकृत लोकांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत तरी चारच गुन्हेगारांना राज्य सरकारने अटक केली आहे. व्हिडियो बघून देश व देशाबाहेरून जनभावनांचा उद्रेक झाला तेव्हा ७७ दिवसांनी अटक? बिरेन सिंह सरकार कशाची वाट बघत होते? परिस्थिती अधिक चिघळून नरसंहार व्हायची? की सर्व कुकी महिला व बालके यांना नागवं करून, हालहाल करून जाळण्याची? वरून येणारे आदेश मुकाट्याने पाळणाऱ्या मुख्यमंत्र्याची लबाडी न कळण्याइतपत भारतीय जनता इतकीही राजकीय अशिक्षित नक्कीच नाही. ”राजकारण मला कळत नाही किंवा मला राजकारणात पडायचे नाही” म्हणत पळवाट शोधणाऱ्या ढोंगी लबाड माणसांनी हे लक्षात घ्यावं की, ही आग तुमच्या घरापर्यंत येईल व घरातही शिरेल तरी तुम्हाला थांगपत्ता लागायचा नाही. राजकारण आपल्या जगण्याच्या प्रत्येक बाबीवर प्रभाव टाकत असतो. प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा जवळून संबध येतोच त्यामुळे मी राजकरणात पडत नाही मला त्यातले काही कळत नाही म्हणत कातडी बचाव दांभिकपणा सोडणे अपरिहार्य आहे. बोलावे लागेल, भूमिका घ्यावीच लागेल. कुणी जात्यात तर कुणी सुपात आहे एवढेच!
तालिबान्यांना नावे ठेवणारे आपण त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेऊन चाललोय का? जरा तपासा. ते कट्टर मुस्लिम आणि आपण कट्टर मनुवादी होत असू; लोकशाही , संविधान, समता , धर्मनिरपेक्ष समाजवादी भारताचे रूप बिघडवू पाहात असू तर आपणही तालिबानच्या वाटेवर येऊन पोंहचलो आहोत लक्षात घ्या! वाचायला पचायला कठीण जाईल पण सत्य हे सत्य असते ते बदलत नाही. नेत्याचे दैवतीकरण थांबवा, डोकी ठिकाणावर आणि मेंदू विचार करायला वापरा. द्वेषाने प्रश्न किचकट बनतात, द्वेषाने द्वेष वाढतो. प्रेम, सामंजस्य आणि सलोखा ठेवला तर जगणं सहज सुंदर होतं. त्या कुकी आदिवासी महिलेला नग्न करताना इथली जातपितृसत्ताक व्यवस्थाच नागडी झालीय हे निश्चित!
‘बेटी बचाव’ घोषणा देणारेच स्त्रीला ओरबाडत सुटले आहेत. स्त्रीशक्ती, स्त्री देवी, स्त्री माता, स्त्री दुर्गा वगैरे हे शब्द सोयीने वापरायच्या फक्त? आता मणिपूरच्या नागवल्या गेलेल्या स्त्रिया आमच्या जातीच्या नाहीत म्हणून आम्ही साधा निषेधही करणार नाही हीच नीच मनोवृत्ती वाढत जाताना दिसते. ती आदिवासी आहे म्हणून तिच्यासाठी निर्भया, कोपर्डीसारखे मोर्चे निघणार नाहीत, आंदोलने होणार नाहीत. यावरूनच बघा न माणूस म्हणून आपण किती संपलो आहोत, लयाला गेलो आहोत. आपण अशावेळी बोलणार नसू तर देशाला हुकूमशाहीत लोटण्यासाठी, देश भांडवलशहाच्या घशात घालण्यासाठी तुम्ही जबाबदार घटक आहात. कितीही मोठे अंधभक्त असा पण एक गोष्ट लक्षात घ्या “आज ही अराजकता पसरवण्यासाठी तुम्हाला मोठ्या शिताफीने वापरले जात आहे. तुम्ही माणूस नसून बुद्धीहीन विध्वंसक यंत्र वा गुलाम बनले आहात.” त्या स्त्रीपेक्षा इथली विषमतावादी, पुरुषी धर्मांध व्यवस्था, सरकार नागडे उघडे पडलेय, हो हे सरकार नागडे झाले आहे. आता सद्सद्विवेकी जागरूक नागरिक म्हणून तुमचे मत तुम्ही कसे वापरता? घरातल्या, भवतालच्या मुलांना किती व कसा स्त्रीसन्मान शिकवता? स्वतः किती अंगीकारता हे महत्वाचे आहे. आत्ताच बघा जरा आत डोकावून आपल्या नाहीतर आज ‘तिची’ नग्न धिंड काढली तिथे उद्या तुमच्या घरातली कुणीही स्त्री असू शकते हे नाकारू शकाल? तालिबान्यांना नावं ठेवणारे आपण कुठे आहोत? जरा शोध घ्याच! कुठलाही पूर्वग्रह न ठेवता ‘माणूस’ हे समजून घेण्याचा प्रयत्न करा ते सर्वांच्याच हिताचे आहे. शेवटी साहिर लुधियानवी यांच्या काही ओळी ज्या आजही किती तंतोतंत लागू होतात इथे-
“ज़रा इस मुल्क के रहबरों को बुलाओ
ये कूचे ये गलियां ये मंज़र दिखाओ
जिन्हें नाज़ है हिंद पर उनको लाओ
जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहाँ हैं
कहाँ हैं, कहाँ हैं, कहाँ हैं…”
– डॉ प्रतिभा जाधव, नाशिक
pratibhajadhav279@gmail.com
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत  माहले ,मो .८२०८१८०५१० 
उंबरठाण वन अधिका-याच्या पथकाची कारवाई,खैर तस्करांच्या टोळीला लगाम  
ह.भ.प.भगवान शिंदे
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!