बिटको महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न…
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 18 जानेवारी 2024
β⇔नाशिकरोड, दि.18 (प्रतिनिधी : संजय परमसागर):-गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ, पुणे आणि बहि:शाल शिक्षण केंद्र, नाशिकरोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ भारतरत्न डॉ. बाबासाहेब जयकर ‘ तीन दिवसीय व्याख्यानमाला दि.१५ जानेवारी ते १७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. नाशिकरोड बिटको महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण केंद्राचे प्रथम वर्ष असून या तीन दिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे प्राचार्य डॉ. पुंडलिक रसाळ यांच्या हस्ते या नुतन केंद्राचे उद्घाटन झाले.
‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावरील व्याख्यानाने त्यांनी आपले पहिले पुष्प गुंफले. प्राचार्य डॉ. पुंडलिक रसाळ यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाच्या विविध पैलूंची ओळख करून दिली. व्यक्तिमत्व विकास घडवताना बाह्य सौंदर्य पेक्षा मानसिक, सामाजिक जाणीव तसेच वैचारिक मंथन यावर भर देण्यास सांगितले. उत्तम आरोग्य, चेहऱ्यावरील हास्य, चांगले विचार हे व्यक्तिमत्त्वाचे महत्वाचे पैलू आहेत, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. व्याख्यानमालेतील दुसरे व्याख्यान ‘ पानिपतची तिसरी लढाई ‘ या विषयावर डॉ. नरेंद्र पाटील यांनी दिले. डॉ. नरेंद्र पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे हुबेहूब वर्णन विद्यार्थ्यांसमोर केले. तसेच पानिपतच्या युद्धाची कारणमीमांसा समजावून सांगितली. व्याख्यानमालेतील तिसरे समारोपाचे व्याख्यान राजाराम मुंगसे यांनी ‘रसास्वाद ‘ या विषयावर सादर केले. हे व्याख्यान सादर करताना त्यांनी विद्यार्थ्यांना साहित्यातील हास्य, रौद्र, शृंगार, कारुण्य, बीभत्स, भय, अद्भुत या रसांची माहिती करून दिली. या रसांबद्दल सांगताना त्यांनी रसास्वाद कसा घ्यावा? याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या व्याख्यानमालेचे अध्यक्षपद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी भूषविले. व्याख्यानमालेस महाविद्यालयाचे कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ. के. सी. टकले उपस्थित होते. व्याख्यानमालेस मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. के. एम. लोखंडे यांचे मार्गदर्शन आणि उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक व्याख्यानमालेस उपस्थित होते.
बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेतला. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रा. आर. बी. बागुल यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. संभाजी शिंदे आणि प्रा. डॉ. उत्तम करमाळकर यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.डॉ.आरती गायकवाड आणि प्रा.वृषाली उगले यांनी करून दिला. आभार प्रा. डॉ. शरद नागरे, प्रा. मीना गिरडकर, प्रा. सुचिता पुंडलिक यांनी मानले.या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्रा. संतोष पगार, डॉ. विशाल माने, प्रा. कृष्णा गोधे, कुलसचिव राजेश लोखंडे, कार्यालय अधीक्षक मुकुंद सोनवणे,आकाश लव्हाळे यांचे सहकार्य लाभले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो. ८२०८१८०८१०