





आरटीई बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क अंतर्गत प्रवेशाच्या पैशांचा आदेश काढण्यासाठी ”1” टक्का लाच मागणारी मुख्य लिपिक पोलिसांच्या जाळ्यात !

: पुणे लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि 16 ऑक्टोबर 2024
β⇔पुणे,ता.16 ( प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले):- केंद्र शासन व महाराष्ट्र शासन शिक्षण हक्क प्रवेशाबाबत शासनाने अदा केलेले पैसे कायम विना अनुदानित शाळांना देण्यासाठी नाशिक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना आदेश काढण्यासाठी मिळणार्या पैशांच्या मोबदल्यात एक टक्का रक्कमेची लाच मागणार्या मुख्य लिपिक महिलेला लाच-लुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. सेंट्रल बिल्डिंगमधील प्राथमिक शिक्षण संचालनालयात आज 16 ऑक्टोंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. मुख्य लिपिक सुनिता रामकृष्ण माने (वय ४६) असे कारवाई केलेल्या महिलेचे नाव आहे. सुनिता माने या प्राथमिक शिक्षण संचालनालयात मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
शासनाने आर टी ई अंतर्गत बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क दिला असला, तरी शासनाकडून या प्रवेशासाठी मिळणारी फी पदरात पाडून घेण्यासाठी अनेक अडथळे संस्था चालकांना पार करावे लागतात. अगदी उच्च न्यायालयात जाऊन आदेश मिळविल्यानंतरही लाच द्यावी लागत असल्याचे या कारवाईने दिसून येत आहे. तक्रारदार डॉ. प्रसाद सोनवणे प्रदेश अध्यक्ष इंग्लिश स्कूल्स महासंघ (नाशिक ) यांच्या कायम विना अनुदानित प्रकारच्या दोन शाळा आहेत. त्यात इयत्ता पहिली ते बारावीचे शिक्षण दिले जाते. तक्रारदार यांच्या वरील दोन्ही शाळेत २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात आर टी ई अंतर्गत प्रवेशित असलेल्या बालकांना २५ टक्के प्रवेश देण्यात आलेला आहे. सदर प्रवेशाकरीता या बालकांच्या शिक्षणापोटी त्यांची फी ही शासनाकडून शाळांना देण्यात येते. त्यानुसार, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात तक्रारदारांच्या दोन्ही शाळेत आर टी ई अंतर्गत २५ टक्के प्रवेश दिलेल्या बालकांची फी एकूण १२ लाख ६९ हजार १४१ रुपये तक्रारदारास शासनाकडून येणे बाकी होते.

सदर प्रवेशाबाबत उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शासनास आठ आठवड्याच्या आतमध्ये ही रक्कम संबंधित सिद्धी इंग्लिश मेडियम स्कूल संस्थाचालकास देण्याबाबत ऑगस्ट २०२४ मध्ये आदेश देण्यात आला होता. त्याप्रमाणे शासनाने सप्टेंबर २०२४ मध्ये रक्कमही रिलीज केली होती. ही रक्कम तक्रारदार संस्था यांना अदा करण्याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. नाशिक यांना आदेश काढण्याकरीता मुख्य लिपिक सुनिता माने यांनी तक्रारदार डॉ. प्रसाद सोनवणे यांच्याकडे त्यांना मिळणार्या रक्कमेच्या एक टक्के म्हणजे १२ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार डॉ. प्रसाद सोनवणे यांना उच्च न्यायालयापर्यंत खेटे घालून, पुण्यात कागदपत्रासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयात हेलपाटे मारायला लावले आणि परत त्यांना लाच द्यावी लागत असल्याने तक्रारदार यांनी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सदर तक्रारीची पडताळणी बुधवारी करण्यात आली. त्यात मुख्य लिपिक सुनिता माने यांनी लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यानंतर लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी सेंट्रल बिल्डिंगमधील प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार डॉ. प्रसाद सोनवणे यांच्याकडून १२ हजार ६०० रुपये स्वीकारताना सुनिता माने यांना पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुणे स्टेशन हद्दीतील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सदर कारवाईने संस्था चालकांनी डॉ. प्रसाद सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक केले आहे.
नाशिक येथील डॉ प्रसाद सोनवणे- प्रदेश अध्यक्ष इंग्लिश स्कूल्स महासंघ (नाशिक ) यांनी आजपर्यंत शिक्षण विभाग मंत्रालय व वरिष्ठ कार्यालय पुणे येथे 5 वा ट्रॅप यशस्वी केला आहे. यासाठी त्यांना प्रदेश सचिव हरिष शिंदे (सोलापूर ), महाराष्ट्र स्टेट इंग्लिश मिडीयम स्कूल्स असोसीएशन नाशिक चे जिल्हा अध्यक्ष डॉ विष्णु मोरे यांनी सहकार्य केले. सगळ्यांचे ह्याप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदन होतं आहे !
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
.