





ढकांबे (दिंडोरी) येथे वीज कर्मचाऱ्याला मारहाण; शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 20 डिसेंबर 2024
β⇔वणी (नाशिक),ता.20 (प्रतिनिधी: सुरेश सुराशे ):- दिंडोरी तालुक्यातील ढकांबे शिवारात वीज कर्मचारी कशात दिनकरराव निकम यांना मारहाण केल्याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शेतकरी अमोल प्रकाश बोडके याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.
घटनेचा तपशील : दिनकरराव निकम यांना 19 डिसेंबर रोजी ढकांबे शिवारात वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी घटनास्थळी भेट दिली असता शेतकरी अमोल बोडके यांच्या शेतात जेसीबीने शेततळ्याचे खोदकाम सुरू असल्याचे आढळले. खोदकामामुळे जवळील विद्युत तारांचा कट पॉइंटवर एल.टी. वायर उतरून ठेवली गेली होती, ज्यामुळे परिसरातील 5-6 शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. निकम यांनी याबाबत सेक्शन इन्चार्ज सहाय्यक अभियंता अनिल टिक्का यांना माहिती देऊन घटनास्थळाचे फोटो घेतले. यावेळी, अमोल बोडके व बबलू प्रकाश बोडके यांनी फोटो काढण्यास आक्षेप घेतला. संतापाच्या भरात अमोल बोडके यांनी शेतीतील बांबू उचलून निकम यांना मारहाण केली.
गुन्हा दाखल व पुढील तपास: या घटनेनंतर दिंडोरी पोलीस ठाण्यात अमोल बोडके व बबलू बोडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अमोल बोडकेला अटक केली असून पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
वीज कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण: या घटनेमुळे तालुक्यातील विद्युत कर्मचारी भयभीत झाले असून त्यांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाने वीज पुरवठ्याच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
“कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी आणि त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510