





➤ सिडको (नाशिक), ता. ७ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- हल्ली कुटुंबांमधला संवाद कमी होत चालला आहे. त्याबरोबरच अलीकडच्या काळात तरुण पिढी फारशी व्यक्त होताना दिसत नाही . मनमोकळा संवाद साधताना दिसत नाही. सध्याच्या तरुण पिढीने व्यक्त होणे महत्त्वाचे आहे. कुटुंबांतील अल्पसंवादामुळे तरुण पिढीचे मानसिक आरोग्य बिघडत आहे . आपल्याला आपले मानसिक आरोग्य जपता येणे, सध्याच्या काळात गरजेचे आहे. गरज पडल्यास त्यासाठी समुपदेशक मानसोपचार तज्ज्ञ किंवा मनोविकार तज्ज्ञ यांची मदत घेणे यात काहीही गैर नाही, असे प्रतिपादन डॉ. हेमंत सोननीस यांनी केले.
एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स महाविद्यालयात मानसशास्त्र वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त मानसशास्त्र विभागाच्या १३ व्या अंकुर फेस्टिवलचे विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून संवाद साधत होते. आपला आहार, झोप, व्यायाम, या महत्त्वाच्या गरजा आहेत. त्याचबरोबर मानसिक आरोग्य ही देखील आपली महत्त्वाची गरज असून याकडे दुर्लक्ष न करता, आपले मानसिक आरोग्य सुस्थितीत राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजे, आपल्या धावपळीच्या जीवनात अध्यात्मिक व सामाजिक आरोग्य महत्त्वाचे आहे, असे डॉ. सोननीस यांनी बोलतांना सांगितले .
प्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे यांनी शिक्षकाचे नाते याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी प्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजश्री कापुरे, प्रा. तन्मय जोशी, प्रा. अर्चना गटकळ, प्रा. इन्शा जहागीरदार, प्रा. ओजस्विता पिंपळे, रसिका भोरे, महाविद्यालयाच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील मानसशास्त्र विषयाचे विद्यार्थी सुट्टीच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राजश्री कापुरे यांनी केले तर सूत्रसंचालन अमोघ ठाकूरदास, अक्षदा सलसिंगिकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा . तन्मय जोशी यांनी केले.
उद्या महाविद्यालय प्रांगणात अंकुर फेस्टिवलचाच एक भाग म्हणून सोशिओ-सायंटिफिक प्रदर्शन भरणार आहे. हे प्रदर्शन यंदा मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहे. मानवी आरोग्य आणि कल्याण, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा, शाश्वत शहरे, समुदाय आणि स्मार्ट गावे, जबाबदार उपभोग आणि उत्पादन, हवामान बदल आणि त्याचे परिणाम, उत्तर पश्चिम घाटाची जैवविविधता, नाशिकचा इतिहास (राजकीय, सांस्कृतिक, वारसा स्थळे इ.) या विषयावर हे पोस्टर प्रदर्शन, रांगोळी, मॉडेल्स असणार आहे.