





➤ सिडको (नाशिक), ता. ८ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- नाशिक येथील एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स महाविद्यालयात ‘सोशिओ सायंटिफिक प्रदर्शन’ ‘द क्वीरीज माईंड सायंटिफिक असोसिएशन’ च्या वतीने प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, वैज्ञानिक रामशिष भुतडा यांनी केले. उद्घाटन प्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी प्रदर्शनाविषयी व्यक्त होताना सांगितले, की एकाच वेळी कला आणि विज्ञान शाखांच्या विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी या प्रदर्शनातून मिळाली आहे.
त्यानंतर बोलातांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे यांनी सांगितले की, भविष्यात सोशिओ-सायंटिफिक प्रदर्शनाचा विस्तार करत विद्यापीठाच्या आविष्कार स्पर्धेच्या धर्तीवर महाविद्यालयात स्पर्धा घेणार असल्याचे सांगितले. युनायटेड नेशनच्या मानव विकासाच्या उद्दिष्टांवर आधारित या प्रदर्शनासाठी विविध आठ विषय निवडण्यात आले होते. मानवी आरोग्य आणि कल्याण, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा, शाश्वत शहरे, समुदाय आणि स्मार्ट गावे, जबाबदार उपभोग आणि उत्पादन, हवामान बदल आणि त्याचे परिणाम, उत्तर पश्चिम घाटाची जैवविविधता, नाशिकचा इतिहास (राजकीय, सांस्कृतिक, वारसा स्थळे इ.) या विषयांवर आधारित प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या पोस्टर, मॉडेल्स आणि रांगोळ्या यांचा समावेश होता.
या प्रदर्शनात काही मॉडेल्स ,पोस्टर आणि रांगोळ्या लक्षवेधी ठरल्या. इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी नाशिकच्या मंदिरे, रहाड उत्सव यावर पोस्टर प्रदर्शनात सादरिकरण केले. यासाठी त्यांनी संशोधन करत असे मांडले की, रहाड उत्सवाचा इतिहास सांगताना आपल्याला असे सांगितले जाते ,की या रहाडी पेशवेकालीन असून या रहाडीत पेशव्यांनी रंगोत्सव सुरू केला, परंतु, याही पलीकडे जाऊन या रहाडींचा इतिहास हा प्राचीन असून या नाशिकमधली प्रत्येक रहाड ही कुस्तीच्या तालमीचे स्थान होते. पुढे त्यात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने या रहाडी बंद करण्यात आल्या होत्या. पेशव्यांच्या काळात या रहाडी खुल्या करत त्यांचा वापर रंगोत्सवासाठी सुरू केला.
प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारताच्या पूर्व पर्वतरांग अर्थात गुजरात, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये सापडणाऱ्या विविध पक्षी आणि प्राण्यांची माहिती सांगणारे पोस्टर सादर केले. यात निलगिरी मार्टन, कोचिंग केन कासव अशांचा समावेश होता. शारीरिक आजार आणि मानसिक आजार यांचा सहसंबंध दर्शवत शारीरिक ताण आणि मानसिक ताण यांचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो. आपल्या शरीरातल्या अंतर्गत अवयवांवर मानसिक ताण-तणावाचा सुद्धा परिणाम होत, विविध आजार बळावू शकतात. तसेच शरीर ही देणगी आहे. या शरीराला जाणून घेत सुस्थितीत ठेवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले पाहिजे, अशा आशयाचे पोस्टर आणि मॉडेल प्रदर्शनात समाविष्ट होते.
हृदय सुस्थितीत ठेवण्यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे. विषयावर आधारित मॉडेल विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी सादर केले समतोल आहार योग्य पद्धतीने केलेले शारीरिक कसरती, झोपेच्या वेळा, ताण तणाव व्यवस्थापन या गोष्टींची आपण जर खबरदारी घेतली तर आपण निश्चितच हृदयरोग टाळू शकतो, असा आशय या मॉडेलचा होता.
मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींनी ‘आरोग्य आणि कल्याण’ या विषयावर आधारित मानसशास्त्राच्या जपानी आणि भारतीय पद्धतीचे मॉडेल आणि प्रदर्शन यात मांडले होते. जपानमध्ये ‘साऊंड फिलिंग टेक्निक’ मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यासाठी जपानची विशिष्ट प्रकारचे साधने उपलब्ध असतात, आपण त्या अंगीकारतो. परंतु आपल्या भारतीय साधनांच्या वापराकडे लक्ष देत नाही. उदा. देवळातील घंटा ही आपली आपले मन आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी असते.
रांगोळ्यांमध्ये युनायटेड नेशनने मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी नेमून दिलेले विविध १७ ध्येये, हळूहळू लुप्त होत चाललेली नैसर्गिक साधने, नाशिक मधील श्रीरामाचे वास्तव्य अशा विविध विषयांवर आधारित रांगोळ्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी काढल्या होत्या. या प्रदर्शनात ८० मॉडेल्स आणि पोस्टर, तर ३१ रांगोळ्यांचा समावेश होता. या प्रदर्शनात सादरिकरणासाठी दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सदर प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून डॉ. लीना पाठक, डॉ. एस. जी. औटी, डॉ. सी. एस. जावळे काम पाहिले. यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मृणालिनी देशपांडे, उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी, उपप्राचार्य डॉ.लोकेश शर्मा, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख डॉ. आनंदा खलाणे, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रदर्शनास उपस्थित होते.