





गोखले एज्युकेशन सोसायटी आयोजित ‘आय-गेन’ स्पर्धेची अंतिम फेरी’ उत्साहात संपन्न

β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि .11 डिसेंबर 2024
β⇒नाशिक, ( प्रतिनिधी : छाया लोखंडे ) :– गोखले एज्युकेशन सोसायटीच्या केंद्रीय समन्वय समितीतर्फे आयोजित ‘आय-गेन स्पर्धेची अंतिम फेरी’ 11 डिसेंबर 2024 रोजी नाशिक येथील एन.बी.टी. लॉ महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेने विद्यार्थ्यांमधील कलागुण आणि व्यक्तिमत्त्व विकासाला वाव दिला.
उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे ऋषिकेश अयाचीत (माजी कार्यक्रम अधिकारी, नाशिक आकाशवाणी) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, “तुमच्या आतला माणूस जागा करा, गरजवंतांना मदत करा, आणि आपल्या वागणुकीत माधुर्य आणा,” असा संदेश दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व सांगितले. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष डॉ. राम कुलकर्णी (विभागीय सचिव) होते.
समारोप सत्रात डॉ. विनायक गोविलकर (माजी प्राचार्य, बीवायके महाविद्यालय) यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना स्वतःमधील क्षमता ओळखण्याचे आणि ज्ञानाचा समाजहितासाठी उपयोग करण्याचे आवाहन केले. त्यांनी संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्राचार्य एस.बी. पंडित यांच्या योगदानाची आठवण करून दिली. डॉ. आर.पी. देशपांडे (संस्थेचे अध्यक्ष) यांनी विद्यार्थ्यांना “गुरुंप्रती निष्ठा बाळगावी, आवडत्या क्षेत्रात करियर करावे, आणि संधीचे सोन्यात रूपांतर करावे,” असा मोलाचा सल्ला दिला.
स्पर्धेचे स्वरूप व सहभाग :
स्पर्धेत नाशिक, पालघर, आणि मुंबई विभागांतील 180 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. गीतगायन, वकृत्व, काव्यवाचन, एकपात्री अभिनय, चित्रकला, आणि निबंध लेखन या प्रकारांत स्पर्धा घेण्यात आल्या. शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन गटांतील स्पर्धकांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. कार्यक्रमात स्वर्गीय प्राचार्य एस.बी. पंडित यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. तसेच, संस्थेच्या ‘स्वयंप्रकाश’ या संशोधनपर जर्नलचे प्रकाशन करण्यात आले. स्पर्धांचे परीक्षण मान्यवर परिक्षकांनी केले. यामध्ये अनिरुद्ध कुर्तडीकर, सुरभी गौड, ऋषिकेश अयाचीत, वैजयंती भट, आणि इतर नामवंत परिक्षकांचा समावेश होता.
डॉ. राम कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या ब्रीदवाक्याचा (‘विद्यार्थी देवो भव’) आधार घेत, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विजेत्या स्पर्धकांचा चषक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

स्पर्धेतील विजेते :-
- शालेय गट (इ. 5वी ते 7वी):
- निबंध: ईश्वरी शिंदे, मयुरी कोष्टी
- काव्यवाचन: सदिच्छा शिंदे, आरोही वारुंगसे
- गीतगायन: श्लोक बोडके, मंजिरी सावंत
- कनिष्ठ महाविद्यालय गट:
- काव्यवाचन: बसंती विश्वकर्मा, सृष्टी तिवारी
- वत्कृत्व: नैनशिखा मारू, तन्मय करमुनगीकर
कार्यक्रम राष्ट्रगीताने समाप्त झाला. प्रा. डॉ. स्नेहा रत्नपारखी आणि डॉ. मुग्धा जोशी यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर विनोद देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. ‘आय-गेन स्पर्धा’ विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचा, आत्मविश्वासाचा, आणि संधी साधण्याचा मार्ग दाखवणारी प्रेरणादायी संधी ठरली.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०