





|| विठ्ठलाची महिमा अपरंपार ||
β : नागपूर :⇔ “विठ्ठलाची महिमा अपरंपार”-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार)
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 15 जून 2024
β⇔नागपूर., दि.15 (प्रतिनिधी : रमेश लांजेवार):- पांडुरंग हे विष्णुचे अवतार असून ते संपूर्ण सृष्टीचे पालनहार आहेत. तथापि, महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी विष्णू हे पांडुरंगाच्या (विठोबाच्या) रूपात महाराष्ट्राचे “कुलदैवत “आहेत. आषाढ महिन्यात विठोबाच्या गजरात भक्त तल्लीन होत असतात आणि जनुकाय साक्षात विठोबा प्रकट झाल्याचे आपण संपूर्ण महाराष्ट्रात अनुभवू शकतो. महाराष्ट्रातील संतांच्या हृदयात स्थान असलेले पंढरपूरचे विठोबा म्हणजेच महाराष्ट्राचे सर्वांचा आदर्श दैवत आहे. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी, ज्याला आषाढी किंवा ‘देवशयनी एकादशी’ असे म्हटले जाते. ह्या दिवसाला ‘महाएकादशी’ असेही संबोधले जाते. या दिवशी घरातील प्रत्येक लहान-मोठा व्यक्ती उपवास करून विठोबाच्या चरणी पूजा-अर्चना करून नतमस्तक होतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करतो.
वर्षातील एकूण २४ एकादशींमध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्व आहे. या एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील लाखो भाविक आणि वारकरी वारी घेऊन पंढरपूरला जातात आणि प्रत्येक भक्ताला वाटते , की जीवनात एकदा तरी वारी अनुभवावी म्हणजे आपण वारीचे खरे स्वरूप समजू शकतो. पंढरपूरची वारी म्हणजे साक्षात पांडुरंगाचे दर्शन मानले जाते आणि यामुळे महाराष्ट्राला संतांची भूमी असे संबोधले जाते. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, आणि संत मुक्ताबाई यांच्यासारख्या महान संतांनी संत परंपरेचा वारसा जोपासला आहे. या संतांनी ‘कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे समान व सारखे’ अशी समतेची भावना लोकांच्या मनात रुजवली आहे. यामुळेच संपूर्ण भारतात महाराष्ट्राला ‘संतांची भूमी’ म्हणून मानले जाते. आषाढी एकादशीचा हा पवित्र दिवस भक्तांच्या मनात धार्मिक आस्थेचा आणि संतपरंपरेच्या महत्त्वाचा एक विशेष स्थान निर्माण करतो. आजही संपूर्ण महाराष्ट्रात संतांचा वारसा सहजपणे दिसून येतो आणि ही महाराष्ट्रासाठी एक गर्वाची गोष्ट आहे.
आषाढी एकादशीचा दिवस महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात एक खास स्थान राखतो. आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाची सुरुवात होते. यावेळी भगवान विष्णू शेष नागावर निद्रास्थ होतात आणि चातुर्मासाच्या समाप्तीनंतर म्हणजेच कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीला ते जागे होतात. आषाढी एकादशीला अनेक पवित्र स्थानांवरून विविध संतांची पालख्यांची पंढरपूरकडे यात्रा सुरु होते. आळंदीवरून संत ज्ञानेश्वरींची, देहूवरून संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, उत्तर भारतातून संत कबीर यांची आणि पैठणवरून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी येते. या पालख्यांबरोबर लाखो भाविक पायी विठू नामाचा गजर करत पंढरपूरला पोहचतात. एकादशीच्या दिवशी भाविक पहाटे उठून चंद्रभागेच्या तीरी स्नान करतात आणि तुळशीच्या पानांची अर्चना करून विठोबाची पूजा-अर्चना करतात. विठोबा म्हणजेच साक्षात विष्णूचाच अवतार मानला जातो. विठोबाच्या चरणी मस्तक ठेवून भक्त मानवजातीच्या कल्याणासाठी आणि येणाऱ्या विघ्नांचे निवारण होण्यासाठी साकडे घालतात, तसेच राज्य सुजलाम सुफलाम होण्यासाठी मनोकामना करतात. आषाढी एकादशीला पौराणिक कथांमध्येही एक विशेष स्थान आहे. पुराणांमध्ये एक कथा आहे की मृदुमान्य नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करून त्यांना प्रसन्न केले आणि ‘मला मरण येणार नाही’ असा वर मागितला. त्यानंतर मृदुमान्य राक्षसाने देवतांवर विजय मिळविण्याचा निश्चय केला. या स्थितीत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एका गुहेत तीन दिवस लपून बसण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या एकवटलेल्या श्वासातून एकादशी देवी उत्पन्न झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाचा वध केला, हीच आषाढी एकादशी होय. या दिवशीपासून चातुर्मास सुरू होतो, ह्या कथांचे वर्णन पुराणांमध्ये आढळते. विदर्भातले पंढरपूर, ज्याचे ‘धापेवाडा’ म्हणून २८३ वर्षांचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे, हे विदर्भातील धार्मिक जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी भक्तांची श्रद्धा, धार्मिकता आणि संत परंपरेच्या पालनाची भावना महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
आजही आषाढी एकादशीपासून ते गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आखाडीच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत धापेवाड्याला भव्य यात्रा आयोजित केली जाते. धापेवाड्याचे पांडुरंगाचे परमभक्त श्री संत कोलबाजी महाराज दरवर्षी पंढरपूरच्या वारीसाठी जात असत. वृद्धापकाळामुळे पंढरीची वारी करणे शक्य नसल्याची खंत त्यांना वाटू लागली. विठोबाच्या परमभक्त असलेले कोलबाजी महाराजांवर विठोबाच्या मनाशीच चिंता वाटू लागली . अशा परिस्थितीत पांडुरंग त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणाले, “हे माझ्या परमभक्त, तू माझ्या पर्यंत येऊ शकत नाही हे मला समजते. म्हणून मी स्वतः तुझ्या भेटीसाठी धापेवाड्यात येत आहे.” या स्वप्नातून प्राप्त झालेल्या आदेशानुसार, श्री संत कोलबाजी महाराजांनी स्वतःला धन्य मानले आणि पांडुरंग धापेवाड्यातील चंद्रभागेच्या काठावरील विहिरीत स्वयंभू विठोबाच्या रूपात गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आषाढी पौर्णिमेच्या प्रतिपदेला प्रकट झाले. ही एक पौराणिक आख्यायिका आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात एकादशीच्या पाचव्या दिवशी म्हणजे गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी धापेवाड्याला साक्षात पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी भव्य यात्रा लागते. या दिवशी भक्तांची मोठी गर्दी धापेवाड्यात एकत्र होते, आणि पांडुरंगाच्या दर्शनाची महती अनुभवतात. पुराणांमध्ये मृदुमान्य नावाच्या राक्षसाने देवतांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला, असे वर्णन आहे. या परिस्थितीत, या तिन्ही देवतांनी एका गुहेत तीन दिवस लपून बसले. त्यांच्या श्वासातून एकादशी देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाचा वध केला. हे पुराणांमध्ये आढळणारे वर्णन आजच्या काळात आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो: पृथ्वीवरील संपूर्ण जीवजंतूसाठी श्वास (ऑक्सिजन)ची जोपासना करणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी वृक्ष लागवड अत्यंत महत्वाची आहे. आषाढी एकादशी आणि गुरूपौर्णिमा यांची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपताना, आपल्याला या पर्वाच्या महत्त्वपूर्ण संदेशांचे पालन करणे आवश्यक आहे.
आजच्या आधुनिक महाराष्ट्रात आपल्याला दऱ्या, डोंगर, आणि बंजार जमीन यांचा समृद्ध देखावा पाहायला मिळतो. तथापि, या प्राकृतिक संपदेच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण जगाने ऑक्सिजनसाठी किती धडपड केली, याचे उदाहरण आपल्याला शिकविले आहे. या महामारीने ऑक्सिजनच्या महत्वाची जाणीव आपल्याला करून दिली आहे. पृथ्वीला व पृथ्वीवरील जीवसृष्टीला वाचविण्यासाठी सावधगिरीचे उपाय म्हणून आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली पाहिजे. घराघरात झाडे लावणे, बंजार जमिनीवर वृक्षारोपण करणे, आणि गडकिल्ल्यांचे संरक्षण यावर लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी सरकार, सर्वसामान्य नागरिक, सरकारी अधिकारी, राजकीय पुढारी, आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन वृक्षलागवडीला महत्व दिले पाहिजे. यामुळे न केवल गुरांना चारा मिळेल, तर संपूर्ण जीवसृष्टीला ऑक्सिजन उपलब्ध होईल. जंगल संपदांचे संरक्षण करणे हे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे, कारण प्रत्येक झाड, पान, फूल आणि फळ यामध्ये विठ्ठलाचे दर्शन घडते. आता आपल्याला समजले पाहिजे की झाडे लावणे आणि हिरवळ टिकवणे हे केवळ पर्यावरणीय मुद्दा नाही, तर ते आपल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा भाग देखील आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी वृक्षलागवडीच्या माध्यमातून प्रदूषणावर मात करण्याची दिशा ठरवू या.
!जय हरी विठ्ठल ! पांडुरंग हरी !
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९,
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)