





“कलाल-कलार समाजाच्या हक्कासाठी संघर्ष: सरकारकडून डावलले जाण्याचा सवाल”
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि 10 ऑक्टोबर 2024
β⇔ नागपूर : ता.10 ( प्रतिनिधी : रमेश लांजेवार ):-
राज्यातील जैन, बारी, तेली, हिंदू-खाटीक, लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवार, ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी, २४ सप्टेंबर २०२४ रोजी ब्राह्मण आणि राजपूत समाजांसाठी नवीन महामंडळाला कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली होती, तर ३० सप्टेंबर २०२४ रोजी सोनार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करण्यात आली. या निर्णयांमुळे विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मालिका सरकारकडून सुरू आहे.
“महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेचा” या नव्या महामंडळांच्या स्थापनेला कोणताही विरोध नाही. उलट, दिलेल्या महामंडळाचे समाजाकडून स्वागतच करण्यात आले आहे, कारण यामुळे समाज आणि राज्याचा सर्वांगीण विकास होईल अशी आशा आहे. मात्र, सर्व शाखीय कलाल-कलार समाजाच्या बाबतीत, सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
गेल्या अनेक वर्षांपासून, संपूर्ण कलाल-कलार समाज “महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या” नेतृत्वाखाली आपल्या आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्या मांडत आहे. या मागण्यांच्या अनुषंगाने मोर्चे काढून, निवेदन देऊन, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांशी थेट चर्चा करूनही या समाजाच्या मागण्यांना सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही. हे सरकारचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. राज्याच्या तळागाळातील सर्व शाखीय कलाल-कलार समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत देशाच्या कल्याणासाठी मोलाचा संघर्ष केलेला आहे, तरीही त्यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे.
कलाल-कलार समाजाने “भगवान सहस्त्रबाहू आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करण्याची मागणी केली आहे, परंतु सरकार यावर केवळ तोंडदेखलं उत्तर देत असल्याचे दिसून येते. सरकार निवडणुकांच्या तोंडावर दर आठवड्याला विविध समाजांना महामंडळ जाहीर करत आहे, मात्र कलाल-कलार समाजाला अद्यापही वाऱ्यावर सोडले जात आहे. यामुळे राज्यभरातील कलाल-कलार समाजबांधवांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे: आमचा समाज राज्याचा अविभाज्य हिस्सा नाही का? आम्हाला विकासाच्या प्रवाहात का डावलले जात आहे?
या परिस्थितीत, सरकारने तातडीने सर्व शाखीय कलाल-कलार समाजासाठी “भगवान सहस्त्रबाहू आर्थिक विकास महामंडळ” स्थापन करून समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा करावा. यातच सरकार आणि समाजाचे कल्याण आहे. अन्यथा, आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे महाराष्ट्र कलाल-कलार समाज संघटनेच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत, ताबडतोब समाजाला विकासाच्या प्रवाहात सामील करावे.
लेखक-
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )