Breaking
संपादकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त कार्यकर्तृत्वाची आणि मानवतावादी आदर्श नैतिक मूल्यांची जाणीव व्हावी – डॉ. राजेश नंदनवरे

संपादकीय - डॉ. राजेश नंदनवरे

018501

▶ छत्रपती संभाजीनगर , ता. १३ ( दिव्य भारत वृत्तसेवा ): आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती! दरवर्षीप्रमाणे आपण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतो. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांसारखे अनेक विचारवंत आणि समाज सुधारकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजव्यवस्थेला आणि संपूर्ण मानवजातीला दिशा देण्याचे अद्भुत असे कार्य केलेले आहे. आपण या महान विचारवंतांची आणि समाजसुधारकांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करत असतो. यामागील प्रयोजन म्हणजे नवीन पिढीला त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आणि मानवतावादी अशा आदर्श नैतिक मूल्यांची जाणीव व्हावी आणि त्यांच्या ह्या आदर्शाची नवीन पिढीने जोपासना करून त्यामधून प्रेरणा घ्यावी. आपण समाजाचा एक घटक असून राष्ट्राचा एक जबाबदार, कर्तव्यदक्ष नागरिक आहोत ही जाणीव तरुण पिढीमध्ये निर्माण व्हावी. समाज व्यवस्थेमध्ये व्याप्त सर्व प्रकारची विषमता आणि भेदभाव निर्मूलनामध्ये तरुणांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन या महान विचारवंतांच्या आदर्श अशा समतावादी विचारांची आणि कार्याची जोपासना करावी. यासाठी आपण सर्व महापुरुषांचे नेहमी स्मरण करतो. समाजामध्ये व्याप्त सर्व प्रकारची विषमता ही मानवनिर्मित आहे. जातिव्यवस्थेच्या माध्यमातून आपले राष्ट्र विभागलेले आहे. ज्या राष्ट्रांमध्ये एखाद्या विशिष्ट समुदायाला त्यांच्या अधिकार आणि हक्कापासून वंचित ठेवले जाते असे राष्ट्र कधीही सर्वांगीण प्रगती करून विकास साधू शकत नाही. राजकारण, अर्थकारण, प्रशासन, शिक्षण, उद्योग, व्यापार यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये एखाद्या विशिष्ट समुदायाचे वर्चस्व किंवा मक्तेदारी प्रस्थापित न होता वंचित, उपेक्षित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हे सर्जनशीलतेचे आणि सुज्ञपणाचे लक्षण होय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये व्याप्त सर्व प्रकारच्या विषमते विरोधात बंड पुकारले होते. एखाद्या विशिष्ट समुदायाला त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित ठेवणे आणि त्यांना गुलामीची, अपमानास्पद वागणूक देणे तसेच त्यांना विकासाच्या सर्व संधी नाकारणे हे सर्व म्हणजे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण होय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय समाज व्यवस्थेमध्ये व्यापक परिवर्तन अपेक्षित होते आणि तशा प्रकारचे परिवर्तन बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पुढाकार घेणाऱ्या काही नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व ओळखून त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. बहुजन समाजाला त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देऊन त्यांचे हक्क आणि अधिकारांशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही तडजोड केली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व घडले ते म्हणजे त्यांच्या वडिलांनी बालपणी केलेल्या संस्कारामुळे तसेच त्यांचे शालेय शिक्षक आणि तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज तसेच या भारतीय समाजव्यवस्थेतील उपेक्षित, शोषित, वंचित घटकांकडून त्यांना ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, “Life should be great rather than long” त्यांचा हा संदेश तरुणांसाठी प्रेरणादायक असा आहे. डॉ. बाबासाहेब यांची अनेक ग्रंथ आणि पुस्तके दिशादर्शक असून मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत ही वर्तमानपत्रे वंचित, उपेक्षित आणि बहुजन समाजासाठी दिशादर्शक ठरली. भारतीय समाज व्यवस्थेमधील बहुजन, उपेक्षित घटकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांच्यामध्ये आत्मसन्मानाची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागृत केली. हजारो वर्ष अन्याय, अत्याचार आणि अपमानास्पद वागणूक सहन करून गुलामगिरी मध्ये जीवन जगत असलेल्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आणि न्याय हक्कासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये अपेक्षित असे सकारात्मक बदल घडून आणले. राज्यघटना सर्व भारतीय नागरिकांच्या आशा-आकांक्षाचे प्रतीक असून धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करून सर्व धर्मांना समान वागणूक भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांसाठी न्याय हक्क आणि अधिकाराची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये व्याप्त सर्व प्रकारच्या विषमता आणि भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी समाजात मूलगामी असे परिवर्तन घडवून आणले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कि, कोणतीही शासन व्यवस्था ही परिपूर्ण नसते पण त्यामध्ये आपण अपेक्षित सकारात्मक सुधारणा करू शकतो. भारताने संसदीय लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली कारण ती एक जबाबदार शासनपद्धती आहे. लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते. लोकशाही शासन पद्धती मधील दोष दूर करून पारदर्शक राज्यकारभार करणे शक्य आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापक आणि मूलगामी असे परिवर्तन घडवून आणले. हे सर्व करत असताना अनेक उपेक्षा, अपमान आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या पण त्यांनी आपला मार्ग कधीही सोडला नाही. फक्त बहुजन समाजच नाही तर सर्व भारतीय नागरिकांच्या उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये मोठे योगदान देऊन सर्व जगासमोर एक आदर्श निर्माण केला. जगाला शांतता आणि समतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यामागे देखील विशिष्ट असे कारण होते. तत्कालीन हिंदू समाज व्यवस्थेमधील अनिष्ट प्रथा, परंपरा, जातीभेद यामुळे समाजाला एक विकृत स्वरूप आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, “I like the religion that teaches Liberty, equality and fraternity” जो धर्म स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देतो, विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ आणि उदारमतवादी असा दृष्टिकोन बाळगतो. सामान्यातील सामान्य माणसामध्ये कोणताही भेदभाव न ठेवता समाजात प्रतिष्ठा मिळवून देतो तो धर्मच राष्ट्राला आणि समाजाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन तेव्हाच करता येईल जेव्हा आपण त्यांचा वारसा, त्यांचे आदर्शवादी विचारांची जोपासना करू. भारतीय संविधानानुसार या देशाचा राज्यकारभार पारदर्शकपणे पार पडल्यास, नागरिकांचे हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच न होता, उपेक्षित आणि वंचित बहुजन समाजाच्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाची जपवणूक करणे म्हणजेच

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन करणे ठरेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!