





ऑनलाईन फोन पेच्या बोगस व्यवहाराने व्यावसायिकांमध्ये खळबळ; फसवणुकीमुळे हाहाकार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 24 डिसेंबर 2024
β⇔येडशी,(धाराशिव ),ता.24(प्रतिनिधी : सुभान शेख):- मागील काही महिन्यांपासून व्यावसायिकांना ऑनलाईन बोगस फोन पे ॲपद्वारे फसवणुकीचे प्रकार वाढल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मोबाईल खरेदी-विक्रीसाठी किंवा मोठ्या व्यवहारांसाठी दुकानात आलेल्या काही ग्राहकांनी खोट्या फोन पे ॲपचा वापर करून व्यावसायिकांची फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
फसवणुकीचा प्रकार:व्यावसायिकांच्या माहितीनुसार, ग्राहक बोगस फोन पे ॲपचा वापर करून खोट्या व्यवहारांचे प्रदर्शन करतात. उदाहरणार्थ, त्यांच्या खात्यात 12,000 रुपये असतानाही बोगस ॲपद्वारे 15,000 रुपये जमा झाल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवला जातो. परंतु, प्रत्यक्षात पैसे खात्यावर जमा होत नाहीत. या प्रकारामुळे अनेक व्यावसायिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
पुणे, धाराशिव, तसेच येडशी तालुक्यात अशा फसवणुकीच्या घटना घडल्या असून, इतर ठिकाणीही या प्रकाराची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.
व्यावसायिकांची मागणी: व्यवसाय करताना काळजी घ्या:ऑनलाईन व्यवहार करताना खरेदीदाराकडून दाखवलेला व्यवहार खात्रीशीर असल्याची खातरजमा करा. फसवणूक झाल्यास त्वरित स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. पोलिसांनी कठोर कारवाई करावी:फसवणूक करणाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना अटक करावी. बोगस फोन पे ॲपचा शोध घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.
व्यापाऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा: व्यवसाय करताना ऑनलाईन व्यवहारांबाबत जास्तीत जास्त सतर्कता बाळगा. कोणतीही शंका असल्यास व्यवहार स्वीकारण्याआधी तांत्रिक तपासणी करणे अत्यावश्यक आहे. या फसवणुकीमुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, पोलिसांनी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी व्यावसायिक समुदायाकडून करण्यात येत आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510