





दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात 13 उमेदवार शर्यतीत कायम: महायुती व महाविकास आघाडीत थेट लढत

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 6 नोव्हेंबर 2024
β⇔ वणी (नाशिक), ता.6 (प्रतिनिधी : सुरेश सुराशे ):- दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर आता निवडणुकीचे वातावरण तापले आहे. 21 इच्छुकांपैकी 8 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, 13 उमेदवारांनी मैदानात आपली जागा कायम ठेवली आहे. या घडामोडींमुळे मतदारसंघातील निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे, विशेषतः महायुती व महाविकास आघाडी या प्रमुख पक्षांमधील थेट संघर्षामुळे.
माजी आमदार धनराज महाले, यांना महायुतीकडून एबी फॉर्म मिळूनही अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतली आहे. महाले यांच्या माघारीमध्ये आ. नरहरी झिरो साहेबांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे समजते. झिरो साहेबांनी महाले यांना माघार घेण्यासाठी यशस्वीपणे तयार केले, ज्यामुळे महायुतीत एकसूत्रता निर्माण झाली आहे आणि आघाडीला अधिक प्रतिस्पर्ध्यांची ताकद उभी राहिली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवार संतोष रेहरे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रेहरे यांच्या या निर्णयामुळे मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळाली आहे. यामुळे महाविकास आघाडीला एक अतिरिक्त आव्हान उभे राहिले आहे.
अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांना त्यांच्या पक्षीय चिन्हांचे वाटप केले. उमेदवारांनी चिन्ह घेतल्याबरोबरच आता प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे मतदारसंघात निवडणुकीचा माहोल तापलेला आहे.
आगामी काळात, दोन प्रमुख आघाड्यांमधील संघर्षाची परिणती काय असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510