





सिन्नर विधानसभा : राजाभाऊ वाजे यांची सत्वपरीक्षा

सिन्नर विधानसभा मतदारसंघ: तिरंगी लढत आणि नव्या नेतृत्वाची चाचणी
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 23 सप्टेंबर 2024
β⇔नाशिक,दि.23 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-सिन्नर विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आला आहे. या मतदारसंघात पारंपारिक पक्षांपेक्षा नेते आणि गट महत्वाचे ठरले आहेत. मागील तीन निवडणुकांमध्ये राजाभाऊ वाजे आणि माणिकराव कोकाटे हे एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी राहिले असले, तरी यंदाच्या निवडणुकीत परिस्थिती काहीशी वेगळी आहे. यंदा नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न होत असून, नवीन उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. ही निवडणूक खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी विशेष महत्वाची ठरणार आहे, कारण यावेळी सिन्नरमध्ये तिरंगी लढत अपेक्षित आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे हे प्रमुख उमेदवार असतील, तर उदय सांगळे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरायचे ठरवले आहे. सांगळे यांना कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास त्यांचे स्थान आणखी मजबूत होईल; अन्यथा तिसरा उमेदवार कोण असेल हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सिन्नर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे वाजे यांच्यावर या निवडणुकीत योग्य उमेदवार निवडण्याची मोठी जबाबदारी येणार आहे. माणिकराव कोकाटे यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक नेत्यांशी राजकीय संघर्ष टाळत आपले स्थान बळकट केले आहे. त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून त्यांनी विकासकामांचा पाऊस पाडला आहे. येत्या 30 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिन्नर दौरा अपेक्षित आहे, आणि यावेळी कोकाटे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
महायुतीचे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे स्थान सिन्नर तालुक्यातील एका विशिष्ट समाजापुरते मर्यादित आहे. उदय सांगळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवल्यास भाजपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. सध्या महायुतीमध्ये कोकाटे यांना तगडे आव्हान देऊ शकेल असा उमेदवार नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या गोटात देखील परिस्थिती काहीशी समान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, राजाराम मुरकुटे, आणि अॅड. संजय सोनवणे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे चिरंजीव राजेश गडाख, आमदार कोकाटे यांचे बंधू भरत कोकाटे, तसेच माजी सभापती बाळासाहेब वाघ, रवींद्र पवार आणि अरुण वाघ यांची नावे चर्चेत आहेत.
या निवडणुकीत परिवर्तन घडवायचे असल्यास खासदार वाजे यांना असे उमेदवार शोधावे लागतील, जो आमदार कोकाटे यांना आव्हान देऊ शकेल. चर्चा अशी आहे की, वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण उमेदवार ठरणार आणि काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )