





➤ नाशिकरोड, ता. १९ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):-” आयुष्यात शिक्षण महत्त्वाचे , त्याशिवाय प्रगती नाही . प्रत्येक विद्यार्थ्याने स्वप्न बघायलाच हवे , स्वप्न साकारण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक असून होणा-या चुकांमधून बोध घेऊन पुन्हा होणार नाही याची काळजी घेत आपल्यातील नकारात्मक गोष्टीं टाळून सकारात्मक विचारांनी ध्येय गाठा , ज्ञानाची भुक वाढवा व स्वतःबरोबरच देशाचे भविष्य उज्ज्वल करा ,” असे प्रमुख अतिथी नाशिक पोलिस आयुक्त श्री. अंकुश शिंदे यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात बुधवार दि.१९ एप्रिल रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे यांच्यासह व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त व खजिनदार डॉ. आर. पी. देशपांडे , सहा. सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी , विभागीय सचिव डॉ. आर.एम. कुलकर्णी ,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी , विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. के. सी. टकले , उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे , डॉ. आकाश ठाकूर , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे , विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी होते . प्रारंभी नेहा आहेर , सालिया शेख व सहकाऱ्यांनी स्वागतगीत सादर केले . त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंजुषा कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक करून वरिष्ठ महाविद्यालयाच्या अहवाल उपस्थितांसमोर सादर केला व वर्षेभरातील उपक्रमांवर आधारित ध्वनीचित्रफित यावेळी दाखवण्यात आली . कनिष्ठ महाविद्यालयाचा अहवाल वाचन उपप्राचार्या सौ.सुनिता नेमाडे यांनी केले . गोएसोच्या एच आर डायरेक्टर प्राचार्या डॉ. दिप्ती देशपांडे यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला .
यानंतर भूगोल विभागाचे डॉ. सुधाकर बोरसे व डॉ सचिन गोवर्धने लिखित ‘ वाणिज्य भूगोल ‘ या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले . त्यानंतर प्रमुख अतिथी व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते इ.११वी,१२ वी,पदवी, पदव्युत्तर मधील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण तसेच विविध स्पर्धा , वार्षिक स्नेहसंमेलन स्पर्धा , पोस्टर व मॉडेल मेकिंग, काव्य करंडक स्पर्धा.,एन.एस.एस.,एनसीसी व एअरविंग मधील दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच विविध पुरस्कार, पेटंट मिळवलेल्या व पीएचडी प्राप्त प्राध्यापक यांचा सत्कार करण्यात आला . तसेच यशवंत रारावीकर पुरस्कार , प्राचार्य ह. मा. रायरीकर , आदर्श प्राध्यापक , शिक्षक व कर्मचारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात डॉ. शशिकांत साबळे , डॉ. विशाल माने , डॉ. सतिश चव्हाण , डॉ. मनेष पवार , डॉ. विशाल पवार , पर्यवेक्षिका सौ. प्रणाली पाथरे , सौ. शालिनी शेळके , माधुरी महाजन , मुकुंद सोनवणे , रविकांत शिंदे , विठ्ठल शृंगारे , सुनिल बोराडे , महेंद्र राऊत व अशोक मोजाड तसेच उत्कृष्ट विद्यार्थी कुणाल माळी यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले .
विशेष अतिथी डॉ. आर.पी. देशपांडे , डॉ. राम कुलकर्णी व प्राचार्य डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले .अध्यक्षीय मार्गदर्शन करताना गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक सर डॉ. मो.स. गोसावी यांनी नाशिकरोड संस्थेने विविध उपक्रम व निकालाची परम्परा कायम जपली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कौशल्यास वाव देण्याचे काम सातत्याने करीत आहे . आपले शिक्षण दर्जेदार व काळानुरुप असावे , आपल्याला जे काही मिळाले आहे ते प्रत्येक काम उत्कृष्ट व्हावे तसा ध्यास घेऊन कार्याला झळाळी द्या सुजाण ,सुज्ञ नागरिक बनून समाजासाठी चांगले काम उपयुक्त काम करत वाटचाल करा , असे सांगितले.
कार्यक्रमास एमएसजी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या एस. पी. देशपांडे , एनएसएस कार्यक्रम अधिकारी गणेश दिलवाले , स्टाफ सेक्रेटरी डॉ. विजय सुकटे , डॉ. मिनाक्षी राठी , डॉ. अर्चना पाटील , संजय परमसागर , कुलसचिव श्री. राजेश लोखंडे यासह सर्व विभागप्रमुख , वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सत्कारार्थी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विजया धनेश्वर यांनी केले तर आभार श्री. जयंत भाभे यांनी मानले .