





येडशी अभयारण्याजवळ वाघोबाचे दर्शन; नागरिकांमध्ये घबराट

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. 25 डिसेंबर 2024
β⇔येडशी,(धाराशिव ),ता.25(प्रतिनिधी : सुभान शेख):- धाराशिव तालुक्यातील येडशी अभयारण्य परिसरात मागील आठवड्यापासून वाघोबाचे दर्शन झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचा आढावा: नागरिकांच्या माहितीनुसार, वाघोबाने एका गायीवर हल्ला करून तिला जखमी केले आणि नागरिकांना पाहताच तो तुळजापूर दिशेने अभयारण्यात पळून गेला. दोन दिवसांनंतर ढेंबरेवाडी आणि येडशी घाट परिसरातही वाघोबाचे दर्शन झाले आहे. वाघोबाच्या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणे धोकादायक वाटत आहे.
येडशी परिसरात काही शेतकऱ्यांच्या शेतीचे विद्युत पुरवठा सिंगल फेज आणि थ्री फेजद्वारे होते. मात्र, महावितरणकडून वेळापत्रकात वारंवार बदल होत असल्याने रात्री अपरात्री पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागते. वाघोबा किंवा बिबट्याच्या हल्ल्याचा धोका पाहता, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांची मागणी: शेतकऱ्यांनी महावितरण व वनविभागाकडे मागणी केली आहे की: वाघोबा किंवा बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने त्वरीत उपाययोजना करावी.
जोपर्यंत या प्राण्यांचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत महावितरणने दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत करावा. जर शेतकऱ्यांवर एखादी दुर्दैवी घटना घडली, तर जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. वनविभाग व महावितरणच्या त्वरित हस्तक्षेपाची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510